ठाणे : शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथे झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर सदनिकेच्या प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना समोर आली. या घटनेत त्या सदनिकेत भाडोत्री असलेले मनोज मोरे (45) यांच्या छातीला दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत त्यांची पत्नी अर्पिता (42) आणि मुलगा आरुष (16) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 2 परिसरात करुमेदेव सोसायटी ही सात मजली सोसायटी आहे. त्या सोसायटीचे बांधकाम ते 16 वर्षे जुने आहे. याच सोसायटीच्या टेरेसवरील रुम नंबर 802 च्या हॉलच्या प्लास्टरचा काही भाग शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पडला. अशी माहिती ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी, ठामपा संबंधित विभागांनी धाव घेतली.
ही घटना घडली त्यावेळी, मोरे कुटूंबातील चौघे हॉलमध्ये झोपले होते. ते झोपलेले तेथील प्लास्टरचा काही भाग हा मनोज मोरे यांच्या छातीवर आणि इतर दोघांच्या अंगावर पडल्याने त्यांना दुखापत झाली. तातडीने त्या तिघांना वर्तकनगर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मनोज यांना मृत घोषित केले. तर अर्पिता मोरे यांच्या डोक्याला आणि आरुष याच्या दोन्ही पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर 9 वर्षीय दुसऱ्या मुलाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.