अंबरनाथ : शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी चालकाचा ताबा सुटलेल्या कारने दोन दुचाकींना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून यात अंबरनाथ नगरपालिकेच्ा दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अपघात करणारी ती कार अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार किरण चौबे यांची असून तेही यात किरकोळ जखमी झाले आहेत.
एका सभेसाठी किरण चौबे जात असताना त्यांच्या कार चालकाचा ताबा सुटला आणि कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यातील एका दुचाकीवर अंबरनाथ नगरपालिकेचे कर्मचारी शैलेश जाधव व चंद्रकांत अनार्थे हे दोघेही जागीच ठार झाले. तर दुसरा दुचाक स्वार सुमित चेलानी याला ही धडक एवढया जोरात बसली की तो ब्रिजवरून खाली फेकला गेला. तर कारचालक लक्ष्मण शिंदे हे देखील या धडकेत मृत्युमुखी पडले. शिवसेना उमेदवार किरण चौबे या मात्र किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेचे कर्मचारी असलेले शैलेश जाधव व चंद्रकांत अनार्थे हे दोघे शुक्रवारी एकाच दुचाकीवरून कामावरून घरी जात होते. त्याचवेळी उड्डाणपुलावर त्यांना मृत्यूने घेरले. हे दोघे ही अगदी शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या या मृत्यूने नगरपालिकेत शोककळा पसरली आहे.