ठाणे

Thane crime : वांगणीत गांजा, एम.डी. ड्रग्जसह दोघांना अटक; ५.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात कारवाईचे आदेश असल्या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत. या आदेशानुसार कुळगाव पोलिसांनी वांगणी आणि अंबरनाथ परिसरात कारवाई करत गांजा व एम.डी. ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख ४७ हजार ६९० रुपयांचा अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली.

साईनगर, वांगणी पश्चिम येथे एका इसमाच्या घरात अंमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती कुळगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई केली असता साहील सलीम शेख (३५, रा. साईनगर, वांगणी पश्चिम) याच्या अंगझडतीत ५५.४१० ग्रॅम गांजा, ५.४५० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, ४,७९० रुपये रोख रक्कम आणि ओपो कंपनीचा मोबाईल असा सुमारे १ लाख २० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल आढळून आले.

पोलिसांनी साहील शेख याच्याकडे अंमली पदार्थ कोठून आणला याबाबत चौकशी केली असता त्याने हा माल अल्लाबक्ष गुगोडवली शेख (४५, रा. सिद्धार्थनगर, दर्गा परिसर, अंबरनाथ पश्चिम) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर कुमार अँड सन्स ज्वेलर्सजवळ सापळा रचला. यावेळी तेथे आलेल्या अल्लाबक्ष शेख याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज आणि २६,९०० रुपये रोख रक्कम, असा एकूण ४ लाख २६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यातील गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्लाबक्ष शेख याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन्ही आरोपींकडून एकूण ५ लाख ४७ हजार ६९० रुपयांचा अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या सह या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, पोलीस हवालदार किरण खडताळे, संदीप नलावडे, पोलीस नाईक सोमनाथ मोरे, पोलीस शिपाई आनंदा पाटील, नरेंद्र कोळी, सचिन जाधव, अविनाश वाकचौरे, महिला पोलीस नाईक सुनीता भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुभाष चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT