भिवंडी : शहरातील शांतीनगर पोलीस पथकाने एका 39 वर्षीय नशेची सौदागर असलेल्या लेडी डॉनला 21 जुलै रोजी फिल्मी स्टाईलने सापळा रचून बेड्या ठोकल्या होत्या. शबाना अन्वर कुरेशी असे अटक केलेल्या लेडी डॉनचे नाव आहे. त्यावेळी झाडझडतीत तिच्या दुचाकीतून 20 लाख 75 हजार रुपये किमतीचा 2 किलो 2 ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला होता. खळबळजनक बाब म्हणजे पोलिसांच्या अटकेत असलेल्या शबानाच्या घराची झडती घेतली असता पोलीस पथकाला घरातही अर्धा किलो चरस (अंमली पदार्थाच्या) पुड्या आढळून आल्याने त्याही जप्त केल्या.
गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह शबानाला पोलीस पथकाने चरससह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर पोलीस हवालदार संतोष पवार (47) यांच्या तक्रारीवरून 22 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, नशेची सौदागर शबाना ही मूळची उत्तर प्रदेशची राहणारी असून तिने हा चरस उत्तर प्रदेशमधून भिवंडीत विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे शबानावर यापूर्वी एकही नशेचा गोरखधंदा करत नसल्याचा गुन्हा दाखल नसल्याने तिच्यावर संशय येत नव्हता. मात्र ती राहत असलेल्या भिवंडी शहरातील कसाईवाडा - निजामपूरा भागात नशेची सौदेबाजी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 22 जुलै रोजी शबानाला न्यायालयात हजर केले असता 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली होती. तर त्यावेळी तिच्याकडून अडीज किलोच्या अधिक चरस पोलीस पथकाने जप्त केला होता.
या चरस खरेदी-विक्रीच्या गोरख धंद्यात शबानासह आणखी काही साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून शांतीनगर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून शबानाची पोलिस कोठडी वाढवण्यासाठी तिला सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहितीही विनायक गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान अधिकच्या पोलिस कोठडीच्या कसून चौकशीनंतर रविवार (दि. 28 जुलै) रोजी शबानाकडून पंचांच्या समक्ष तिच्या घरातील आणखी 402 ग्रॅम वजनाचा चरस, एक लहान इलेक्ट्रॉनिक वजन काटा व प्लास्टिकचे लहान - लहान पाऊच असा एकूण 4 लाख 2 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची वपोनि विनायक गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत शबानाकडून 2 किलो 422 ग्रॅम वजनाचा एकूण 24 लाख 22 हजार रुपयांच्या चरससह एक 50 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.