Crime Pudhari
ठाणे

Thane Crime: पैसे परत न दिल्याने हत्या,दोन तासांत मारेकरी गजाआड

डिपॉझिट परत न दिल्याच्या वादातून खून

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कार भाड्याने दिलेल्या इसमाने डिपॉझिट परत न दिल्याच्या वादातून तिघांनी एकाची चाकूने भोसकून खून केल्याची घटना शीळ डायघर परिसरात घडली. डायघर पोलिसांनी तिघा मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्या तावडीतून अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोंबिवलीच्या मानपाडा भागात राहणारा सैफअली निजामुद्दीन खान (29) याने त्याची व्हगॅनर कार महंमद फैसल मतिउल्लाह शेख यास भाड्याने चालवण्यास दिली होती. त्या बदल्यात सैफअली खान याने महंमद शेख कडून डिपॉझिट घेतले होते. काही दिवस कार वापरल्यानंतर महंमद शेख याने सैफअली यास कार परत केली. मात्र सैफअली याने घेतलेले डिपॉझिटचे पैसे तो परत देत नव्हता. यातून दोघांमध्ये वाद सुरू होता.

दरम्यान, 29 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सैफअली खान याने महंमद शेख यास डिपॉझिटचे पैसे परत देतो असे सांगून शीळ फाटा येथील रिगल हॉटेलच्या बाजूस बोलावले. यावेळी महंमद शेख आपले मित्र अबूतालिब, सचिन व अमन शेख यांच्यासह घटनास्थळी पोहचला. तर सैफअली खान हा देखील आपले मित्र शोएब खान व आरिफ खान यांच्यासह घटनास्थळी पोहचला.

यावेळी पैशाच्या वादातून दोन्ही गटात झटापट झाली. याच वादात सैफअली खान, शोएब खान व आरिफ खान या तिघांनी मिळून अमन शेख याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. तर अबुतालीब याच्यावर देखील चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला.

दोन तासांच्या आत गुन्ह्याचा छडा

डायघर पोलिसांनी तांत्रिक तपास व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघाआरोपींचा शोध घेऊन त्यांना दोन तासांच्या आत डोंबिवली येथील देसाई गावातून अटक केली. तर तिघांच्या तावडीतून अपहरण करण्यात आलेल्या महंमद शेख याची सुटका करून त्याचा जीव वाचवला. या प्रकरणी महंमद फैसल मतिउल्लाह शेख याच्या तक्रारीवरून डायघर पोलिसांनी सैफअली निजामुद्दीन खान (29), शोएब निजामुद्दीननखान (20), आसिफ आताउल खान (28) या तिघांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT