ठाणे : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणार्या पतीच्या खुनाचा प्रयत्न पत्नीनेच तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या हेतूने खाडीत फेकून दिले. याप्रकरणी संबंधित महिलेसह तिचा प्रियकर आणि त्याचे दोन मित्र अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून महिलेला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेतील तक्रारदार वांगणी येथील राहणारे आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तक्रारदार यांचे जबरदस्तीने रिक्षात कोंबून अपहरण केले. त्यांना त्यांच्याच पत्नीने ठाण्यातील रेतीबंदर येथे नेले. तिथे बेदम मारहाण केली. त्यानंतर खारेगाव खाडी पुलावर आणून प्रियकर व इतर दोन मित्रांच्या मदतीने त्यांना खाडीत फेकून दिले.
तक्रारदार हे तिथून वाहत पुढे गेल्यावर काही अंतरावर एक सिमेंटचा खांब पकडून ते थांबले. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना 21 सप्टेंबरला रात्री 11:30 ते 22 सप्टेंबर रोजी पहाटे 2:30 वाजे दरम्यान घडली.
उपचारानंतर 22 सप्टेंबर 2025 रोजी घरी सोडल्यानंतर तक्रारदार यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी हत्येचा कट करणार्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली आहे. तिच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.