Panvel Crime CSMT Local Train Incident Viral Video
ठाणे : पनवेलहुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वेमधील महिलांच्या डब्यात एका माथेफिरू पुरुषाने इतर महिला प्रवाशांना त्रास दिल्याचा व महिला डब्यातील एका तरुणीला रागाच्या ओघात अक्षरशा चालत्या रेल्वेमधून बाहेर ढकलून दिल्याचा संतापजनक प्रकार पनवेल रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर घडला आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी या पुरुषाला उतरून इतर डब्यातून प्रवास करण्यास सांगितले असता त्याने दरवाजाच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले. त्यानंतर माथेफिरू पुरुषाला पनवेल लोहमार्ग पोलिसांकडून खांदेश्वर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली असून शेख अखतर नवाज असे आरोपीचे नाव आहे.
श्वेता महाडिक ही विद्यार्थिनी पनवेल परिसरात राहते. श्वेता ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळच्या वेळेस लोकलने प्रवास करत होती. शुक्रवार, रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांची पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल त्यांनी पकडली व लोकल पनवेल रेल्वे स्थानकावरील फलाटांवरून सूट असताना त्याच महिलांच्या डब्यात आरोपी अचानक चढला व डब्यात उपस्थित इतर महिलाने त्याला महिला डब्यातून उतरून इतर डब्यातुन प्रवास करण्यास सांगितले. मात्र आरोपी प्रवाशाने त्यांना नकार देत इतर महिलांना शिवीगाळ व आरडाओरड करू लागला.
तरुणीने देखील त्याला दटावून उतरण्यास सांगितले असता माथेफिरू पुरुषाने असा रागाच्या ओघात असे विकृत आणि संतापजनक प्रकार केले. त्यानंतर डब्यातील इतर महिला प्रवाशांनी तात्काळ महिला हेल्पलाईनवर संपर्क साधून पनवेल लोहमार्ग पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. व पनवेल लोहमार्ग पोलिसांनी आरोपी शेख अखतर नवाजला खांदेश्वर रेल्वे स्थानकात अटक करून पनवेल जीआरपी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल लोहमार्ग पोलीस अधीक्षक प्रवीण तायडे यांनी आरोपी नवाजविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या विनातिकीट प्रवास, मुंबई उपगरीय रेल्वे सेवांच्या नियमांचे उल्लंघन असे इतर रेल्वे प्रशासनाचे दंडात्मक कलम देखील दाखल केले आहे. व आरोपी नवाजला पनवेल शहर न्यायालयात सादर केले असता आरोपी नवाजला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
श्वेता थोडक्यात बचावली
श्वेता थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कंबरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.