डोंबिवली : कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अमली पदार्थ तस्करांची दाणादाण उडवून दिली असतानाच दुसरीकडे वाहतुकीचे नियंत्रण करणार्या पोलिसांनी देखिल हम भी कुछ कम नही करत एका गांजा वाहकावर फिल्मी स्टाईलने झडप घातली आहे. कळव्या जवळच्या विटावा परिसरात राहणार्या आरोपीकडील दुचाकीच्या डिक्कीतून गांजाचा मोठा साठा हस्तगत केला आहे.
कल्याण पूर्वेकडील मलंगगड रोडला असलेल्या चक्की नाक्यावर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ही लक्षवेधी कारवाई केली आहे. नंबरप्लेट नसलेक्या दुचाकीच्या डिक्कीतून गांजाचा साठा, चिलीम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आता हा गांजा कुठून आणला? तो कुणाला वितरीत/विक्री केला जाणार होता? याचा चौकस तपास कोळसेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. चक्की नाक्यावर असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीजवळ पोलिसांनी तपासणी -साठी एक दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. या दुचाकीवर नंबरप्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांना हूल देऊन दुचाकीस्वार पळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी त्याचा मनसुबा उधळून लावला.
तपासणीदरम्यान पोलिसांनी दुचाकीची डिक्की उघडून पाहिली असता त्यात गांजाच्या पुड्या, चिलीम आणि अमली पदार्थ सेवनासाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा सारा मुद्देमाल हस्तगत केला.
भावेश राऊळ या दुचाकीस्वाराला मुद्देमालासह कोळसेवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. गांजा, चिलीम, तसेच सेवनासाठी लागणारी साधनसामुग्री त्याने कुठून आणि कुणासाठी आणली? याचा शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
असा घडला थरारक प्रकार
पोलिस उपनिरीक्षक राजेश भाबल आणि हवालदार विनोद बच्छाव हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रीपूल भागात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. इतक्यात त्यांच्या समोरून भरधाव वेगात एक दुचाकीस्वार चालला होता. त्याच्या दुचाकीवर नंबरप्लेट नव्हती. त्या दुचाकीस्वाराच्या पाठीमागे काही तरुण त्याला पकडा पकडा असे मोठ्याने ओरडत होते. त्याने बैलबाजार भागात एकावर शस्त्राने वार केले आहेत, असे सांगत हे तरुण दुचाकीस्वाराच्या पाठीमागे धावत होते. त्यातील एकाने इशारा करताच उपनिरीक्षक भाबल आणि हवालदार बच्छाव यांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याने भाबल आणि बच्छाव यांना चकवा देत धूम ठोकली.
पोलिसांनीही चारचाकीने भरधाव वेगात पाठलाग करत दुचाकीस्वाराला भाबल यांनी सूचकनाक्यावर पकडले. तरीही तो दुचाकीस्वार पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव भावेश इंद्रजित राऊळ (22, रा. कळवा विटावा) असल्याचे सांगितले. त्याने गांजा सेवन केल्याचा संशय आल्याने उपनिरीक्षक भाबल आणि हवालदार बच्छाव यांनी त्याला कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा नोंदवून समजदारीची नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले. हवालदार सौदाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.