7 वर्षात रोखले राज्यातील 6,400 बालविवाह file photo
ठाणे

Thane Crime : 7 वर्षात रोखले राज्यातील 6,400 बालविवाह

महिला व बालविकास विभाग, चाईल्ड लाईन व सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना यश

पुढारी वृत्तसेवा

अनुपमा गुंडे

ठाणे ः मुलगी म्हणजे परक्याचं धन, तिचे जीवन म्हणजे काचेचं भांड त्यामुळे एकदा तिचं लग्न लावलं की आपण जबाबदारीतून मुक्त झालो, ही भावना आजही महाराष्ट्रातील पालकांच्या मनात आहे. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या बरोबरच, मुलगी प्रेमविवाह करेल या धास्तीने राज्याच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील पालकांचा आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह लावण्याकडे कल असतो, मात्र राज्याच्या महिला व बालविकास विभाग, चाईल्ड लाईन व सामाजिक संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जनजागृतीच्या रेट्यामुळे गेल्या 7 वर्षात राज्यातील सुमारे 6,400 कोवळ्या मुलींचे बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 तर मुलाचे 21 वर्षे आहे. 2007 पासून राज्यात हा कायदा लागू झाला. मात्र आजही गरिबी, प्रथा, परंपरा, समजूती आणि मुलींवरील वाढते अत्याचार, प्रेमविवाह, कायद्या बद्दलचे अज्ञान, लव्ह जिहाद या सारख्या घटनांमुळे आजही अनेक पालक कायद्याला बगल देत सर्रास बालविवाह लावून देतात.

बालविवाह झालेली मुलगी ही मातृत्वाचा भार पेलण्यासाठी शारिरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम नसते, त्यामुळे राज्यात माता-बाल मृत्यूचे प्रमाण आजही लक्षणीय असल्याचे वास्तव आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होताना दिसून येत आहेत.

मुलींचे विवाहाचे वय 21 कधी होणार

बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार करून, केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचे वय वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव 2021 मध्ये आणला होता, मात्र या प्रस्तावावर अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत

बालविवाह मुक्त भारत हे ध्येय ठेवून देशभर महिला व बालविका विभागाच्या मार्फत जाणीव जागृती कार्यक्रम सुरू आहे. ग्रामसंरक्षण समित्या, शाळा-महाविद्यालयांमध्ये जावून मुलींना बालविवाहाचे परिणाम कार्यशाळा, प्रशिक्षणाद्वारे सांगितले जातात. याशिवाय प्रचार फेरी, बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा असे जागृतीचे उपक्रम सुरू आहेत.
- नमिता शिंदे महिला व बालविकास अधिकारी ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT