

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने येथील लहुजीनगरमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. डोक्यावरील टोपीवरून शेजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या हाणामारीदरम्यान हल्लेखोराने गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथ मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. या महिलेवर सायन येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
खडकपाडा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या मोनू शंकर फुलारी (21) याने दिलेल्या फिर्यादीवरून बाबा उर्फ नबाब अस्लम शेख (24), शब्बीर अस्लम शेख (35), अफसर अस्लम शेख (30) आणि शाहरूख अस्लम शेख (27) या चौघांच्या विरोधात भारतीय न्याय संंहितेच्या मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहने येथील लहुजीनगर भागात असलेल्या हनुमान मंदिराजवळ टोपी घालणे आणि ती बदलण्याच्या क्षुल्लक कारणावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास राडा झाला होता. तेथील कांबळे यांनी डोक्यावर टोपी घातली होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नवाब शेख याने ही टोपी कांबळे यांच्या डोक्यावरून काढून स्वतःच्या डोक्यावर घातली. मोनू फुलारी याने ही टोपी नवाब शेखच्या डोक्यातून काढली आणि परत बिगरला दिली. यावरून नवाब शेख संतापला. यावरून नवाब, अफसर, शब्बीर, शाहरूख यांनी शिवीगाळ करत मोनूवर हल्ला चढविला. शिवाय नवाबच्या भावांनी बांबू आणि हॉकी स्टीकच्या साह्याने मोनूवर हल्ला चढवून जबर जखमी केले. भाच्यावर होत असलेली मारहाण पाहून मोनूची मावशी वैशाली मध्ये पडली. नवाब आणि त्याचे नातेवाईक यांच्या हातात हॉकी स्टिक आणि दांडके होते. त्यांनी गरोदर असलेल्या वैशाली हिच्यावरही हल्ला चढविला. याच वेळी नवाब शेखने तिच्या पोटात जोरात लाथ मारली. यात वैशालीच्या पोटामध्ये असलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.