Pradeep Purnekar Case pudhari photo
ठाणे

Pradeep Purnekar Case: पप्या शिंदे, टल्लीच्या नार्को टेस्टला न्यायालयाचा नकार

पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया उर्फ टल्ली यांच्या नार्को, पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंग चाचण्यांना न्यायालयाची परवानगी नाकारली.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाण्याच्या मानपाडा परिसरातील उबाठा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे एसआयटीला न्यायालयाने धक्का दिला आहे. प्रमुख आरोपी पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया उर्फ टल्ली यांच्या नार्को टेस्ट, पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंग चाचण्यांसाठी एसआयटीने केलेला अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपींनी या चाचण्यांना संमती न दिल्याने न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली नाही.

या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस प्रशासन करत असून या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. २९ सप्टेंबर रोजी झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून हत्येसाठी वापरलेली शस्त्रेही जप्त केली आहेत.

मात्र, हत्येच्या वेळी वापरलेले रक्ताने माखलेले कपडे आणि हेल्मेट अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तसेच हत्या नेमकी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि त्यामागील कारण काय, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या महत्त्वाच्या बाबींचा तपास करण्यासाठी एसआयटीने पप्या शिंदे आणि टल्ली यांच्या विविध वैज्ञानिक चाचण्या करण्याची परवानगी मागितली होती.

मात्र, आरोपींच्या नकारानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने तपास यंत्रणेसमोर पुढील तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पूर्णेकर यांच्या हत्येमागील सूत्रधार कोण आणि हत्येचा कट नेमका कुठे शिजला, या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT