हत्येप्रकरणी बहीण-भावाला जन्मठेप  Pudhari File Photo
ठाणे

Thane murder case : हत्येप्रकरणी बहीण-भावाला जन्मठेप

बहिणीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह पत्र्याच्या पेटीत ठेवला

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : बहिणीसोबत लिव्ह-इन- रिलेशनमध्ये राहून नंतर मूळगावी लग्न जमल्याने लग्नाला नकार देणाऱ्या बहिणीच्या प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह लाल पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवणाऱ्या अनिता यादव आणि तिचा भाऊ विजय भलारे यांना ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश जी.जी. भन्साळी यांनी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारच्या वतीने सरकारी वकील म्हणून आर. डब्यू. पांडे यांनी कामकाज पाहिले.

कोरोनोच्या काळात 13 मे 2021 रोजी भयाण शांततेत हत्या प्रकरण घडले आणि उघडकीस आले होते. दिवा-शिळ रस्त्या जवळील खाडी पुलाजवळ लाल रंगाच्या पत्र्याच्या पेटीमध्ये कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेह घटनास्थळी सापडला. डायघर पोलीस आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

डायघर पोलिसांसमोर मृतक व्यक्ती कोण? कुठे राहणारा? हत्या मागचं कारण काय असे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. डायघर पोलिसांनी गांभीर्य ओळखून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्राकांत जाधव, तत्कालीन पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. कापडणीस यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले.

पत्र्याच्या पेटीत मृतदेह सापडल्याने पोलिसांनी सुरुवातीला पत्र्याच्या पेट्या कोण तयार करतो, याची माहिती घेतली. त्यावेळी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पेट्या तयार केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस पथकाने तात्काळ त्याठिकाणी जाऊन पेट्या बनविणाऱ्याची चौकशी केली. ही पेटी त्यानेच तयार केली होती. पेटी तयार करणाऱ्या इसमापर्यंत पोलीस पोहोचले. त्यावेळेस त्यांनी एका महिलेने पेटी विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली.

पेटी बनवणाऱ्या कारखानदाराने पेटी खरेदी करणाऱ्या महिलेचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला. त्या मोबाईल नंबर वरून पोलिसांनी तपास सुरू करत आणि मोबाईलच्या लोकेशनचा मागोवा घेत तांत्रिक अभ्यास करीत पोलिसांनी अनिता यादव हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने भावाच्या मदतीने 6 मे या दिवशी दुपारी 4.30 वाजता प्रियकर मनीष यादव याला दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात नेले आणि बिसा याची आणि डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची कबूली दिली.

पोलिसांना मृतदेहाची ओळख मनीष यादव म्हणून पटली होती. तसेच, या प्रकरणात पथकाने तिचा भाऊ विजय भलारे यालाही अटक केली. अन खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसांनी तपासलेले सीसीटीव्ही साक्षी पुरावे ग्राह्य धरीत आरोपी अनिता यादव आणि भाऊ विजय भलारे याना ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश जी.जी. भन्साळी यांनी हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास ठोठावला.

या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून आर. डब्यू. पांडे यांनी कामकाज पाहिले. तर तपासी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक रामचंद्र के. मोहीते, मार्गदर्शक म्हणून सध्याचे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार एस. एम. सावळे, पोलीस शिपाई म्हणून तोटेवाड तर समन्स म्हणून पोलीस हवालदार कांबळे, झुगरे आणि पोलीस शिपाई सिद्धार्थ पाटील यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT