Thane Corporator Caste Certificate Pudhari
ठाणे

Thane Corporator Caste Certificate: ठाण्यातील बिनविरोध नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र समितीने ठरविले अवैध

शिवसेना शिंदे गटाच्या सुलेखा चव्हाण यांचे पद धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५-अ मधील अनुसूचित जमाती (एसटी) राखीव जागेवरून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे.

धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे ‘कोळी मल्हार’ जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या अपात्रतेबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या तक्रारीनंतर समितीने केलेल्या चौकशीत सुलेखा चव्हाण यांनी सादर केलेले १९५० पूर्वीचे आदिवासी जमातीचे पुरावे बनावट व पुनर्लेखित असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. समितीने दिलेल्या आदेशात, सुलेखा चव्हाण यांच्या नात्यातील व्यक्तींना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्रेही समितीची दिशाभूल करून प्राप्त केलेली आहेत.

तेव्हा, याप्रकरणी संबंधितांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे जाधव म्हणाले. पत्रकार परिषदेत जाधव यांनी खऱ्या आदिवासी उमेदवारांवर अन्याय करून बोगस आदिवासींना राजकीय संरक्षण दिले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी, प्रभाग क्रमांक ५-अ मधील प्रतिस्पर्धी उमेदवार दीप्ती दिनेश जाबर यांचा अर्ज तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सत्वशिला शिंदे यांनी दबावाखाली बाद केल्याचाही दावा केला.

तेव्हा, खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू, अशी भूमिका मांडली. महेश कदम यांनी या निर्णयाला भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराला बसलेली चपराक असे संबोधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT