ठाणे : वाहतुकीचे नियम पाळणे हा आपल्या दररोजच्या व्यवहारातील एक भाग असून नियम मोडल्यास दंड, कारावास होऊ शकतो. तसेच परवानाही रद्द होऊ शकतो. त्यामुळे, वाहतुक नियमांचे पालन करणे केवळ गरजेचेच नसुन स्वतः व इतरांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांची सवयच लावून घ्यावी, असा मौलिक सल्ला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणेकरांना दिला आहे.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मागदर्शनाखाली ठाणे शहर वाहतुक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान - 2026 च्या समारोपाचा कार्यक्रम आज (शनिवार ता.31 जानेवारी) साकेत येथील पोलीस क्रिडा संकुल मैदानात पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी वाहतुक नियमांच्या पालनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वाहन चालविताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, लेनची शिस्त पाळणे, वेगमर्यादा आणि मोबाइलचा वापर टाळणे, वाहतूक सिग्नलचे पालन, मद्यपान करून वाहन न चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी न थांबवणे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे बाळगणे यासारखे नियम पाळले तर बहुतांशी अपघात कमी होतील. असे सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील जवळपास 2 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या साक्षीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 चा धुमधडाक्यात समारोप झाला. आरएसपीच्या विद्यार्थ्यानी आपल्या शिस्तबद्ध संचलनातुन वाहतुक नियमांची जनजागृती केली. समारोप प्रसंगी संचलन आणि बॅण्ड स्पर्धेतील विजेत्यांसह आरएसपी शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. तसेच, शालेय विद्यार्थ्यांची बॅण्ड स्पर्धा देखीर पार पडली. या स्पर्धामधील विजेत्यांचा आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
रस्ता सुरक्षेचे ॲम्बेसेडर बना -सह आयुक्त
रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि जनजागृती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. सडक सुरक्षा-जीवन रक्षा या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत, वाहतूक नियम पाळण्याचे, हेल्मेट, सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन केले जाते. ज्यामुळे रस्ते अपघातातील जीव वाचवण्यास मदत होईल. या अभियानात सहभागी होताना प्रत्येकाने रस्ता सुरक्षेचे ॲम्बेसेडर बनावे, असे आवाहन ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच, इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.