ठाणे : खारीगाव ते गायमुख हा 13 किमी लांबीचा कोस्टल मार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून डिसेंबर 2028पर्यंत खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. या प्रकल्पाचे 28 टक्के काम पूर्ण झाले आहे.
आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकुम येथे पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.
खारीगाव, बाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा कोस्टल मार्ग सहा पदरी असेल. सुमारे 2 हजार 727 लाख खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गामुळे खारीगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून अंदाजे 15 मिनिटांवर येणार आहे. विशेष म्हणजे या मार्गामुळे मुंबई-नाशिक महामार्ग, जेएनपीटी, वाढवण बंदर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने मालवाहतुकीला वेगवान जोडणी मिळणार आहे.
सहा महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून 40 महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या मार्गातील काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून 2028पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणेकरांना कोंडीचा सामना करावा लागतो. या प्रकल्पामुळे या वाहतुकीवरचा ताण कमी होणार असून कळव्यातून होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळणार आहे.
कोस्टल रोडचा काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे पाहणी दौऱ्यात आढळून आले. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ही अतिक्रमणे कोस्टल रोड प्रकल्पाला अडथळा ठरणार असून ती तातडीने दूर करण्यात यावीत, अशा सूचना केळकर यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.