सुरेश साळवे
ठाणे: एकेकाळी तलावांचे, संस्कृतीचे आणि नियोजनबद्ध विकासाचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्याची ओळख आता झपाट्याने बदलताना दिसत आहे. मुंबईलगतचे वेगाने विस्तारत जाणारे हे मेगासिटी शहर आज अनधिकृत बांधकामे, वाढती गुन्हेगारी, अनैतिक धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांनी वेढले गेले असल्याचे चित्र समोर येत आहे. एप्रिल महिन्यात 1100 हून अधिक गुन्हे दाखल झाले असून जुगार, ड्रग्ज, लूटमार अन् हत्यांनी हादरले शहर
ठाण्याचा विस्तार आनंदनगर चेकनाका ते गायमुख, घोडबंदर रोड आणि नव्या गृहसंकुलांपर्यंत मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र या नागरीकरणासोबतच शहरात अनैतिक धंद्यांचे जाळेही अधिक बळकट होत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
मसाज सेंटर, स्पा, ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरू असलेले अवैध प्रकार, निवासी इमारतींमध्ये चालणारे कुंटणखाने, ऑनलाईन माध्यमातून चालणारा देहव्यापार, जुगाराचे अड्डे, मटका, बेकायदेशीर मद्यविक्री आणि अंमली पदार्थांची तस्करी यामुळे ठाण्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 35 पोलीस ठाण्यांमध्ये एप्रिल 2026 या एका महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारीच शहरातील गंभीर स्थिती स्पष्ट करणारी आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधात मोठ्या कारवाया करत कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त केले, अनेक तस्करांना अटक केली. तरीदेखील शहरातील गुन्हेगारी आणि अनैतिकतेचा आलेख कमी होत नसल्याचे वास्तव आहे.
गुन्हेगारीचे स्वरूपही दिवसेंदिवस अधिक आधुनिक आणि संघटित होत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडिया, मोबाईल ॲप्स आणि डिजिटल व्यवहारांचा वापर करून फसवणूक, सेक्स रॅकेट आणि आर्थिक गुन्हे चालवले जात असल्याचे तपासातून उघड होत आहे.
दरम्यान, ठाण्यातील चोरी, घरफोडी, जबरी लूट, हाणामाऱ्या, हत्या, हत्येचे प्रयत्न आणि ऑनलाईन फसवणुकींच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रेल्वे स्थानक परिसर, तलावपाळी, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
धावत्या लोकलमध्येही प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. इराणी टोळीने मागील काही वर्षांत नागरिकांच्या गळ्यातील कोट्यवधींचे सोन्याचे दागिने हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत.
ठाण्यातील जुगार आणि मटक्यांचे अड्डे गल्लोगल्ली सुरू असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी काही तासांतच पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याने पोलिसांच्या कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक ठिकाणी डान्सबार, अवैध मद्यविक्री आणि देहव्यापाराचे रॅकेट सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
एप्रिल महिन्यातील गुन्हेगारीचा धक्कादायक आकडा
खून 5, खुनाचे प्रयत्न 17, सदोष मनुष्यवध 2, अत्याचार 37, दरोडे 4, रॉबरी 23, चोऱ्या 223, फसवणूक 70, अपहरण 137, दुखापतीचे गुन्हे 181, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले 4, विनयभंग 59 अशा एकूण 1,110 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे जुगार आणि अनैतिक धंद्यांवरील कारवाईत जुगार अड्ड्यांवर कारवाई ्र्र- 128, तीनपत्ती/प्रतिबंधित जुगार -41, इतर जुगार कारवाया -765, अशा एकूण 2,044 कारवाया करण्यात आल्याची नोंद आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. “घर सुरक्षित नाही, रस्ता सुरक्षित नाही आणि प्रवासही सुरक्षित नाही” अशी प्रतिक्रिया अनेक ठाणेकर व्यक्त करत आहेत. महिलांच्या सुरक्षेपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणापर्यंत अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत.
पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे
ठाण्याचा वेगाने होणारा विकास, उंच इमारती, मॉल्स आणि आधुनिक सुविधा यांसोबतच वाढणारी अनैतिकता आणि गुन्हेगारी ही शहरासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे केवळ कारवाया नव्हे तर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना, गुप्त माहिती यंत्रणा मजबूत करणे, पोलिसांची संख्या वाढवणे आणि सामाजिक स्तरावर जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.