Thane circular metro project File Photo
ठाणे

Metro Project: ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रोला वादाची किनार

ठाणेकरांच्या माथी प्रकल्प मारला जात असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो-4 ला जोडण्यासाठी ठाणेकरांसाठी स्वतंत्र वर्तुळाकार मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच आता या प्रकल्पावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.

वर्तुळाकार मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होणार असून खोदकाम देखील मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाची आवश्यकता नसतानाही हा प्रकल्प ठाणेकरांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी आणि शहर नियोजन तज्ज्ञांच्या वतीने करण्यात आला आहे.

वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली अशा ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रो मार्गाला राज्य शासनाकडून यापूर्वीच गती मिळाली आहे.

तब्बल 12 हजार 500 कोटींचा प्रकल्प असलेल्या या मेट्रोला केंद्र सरकारकडून यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली होती. महामेट्रो कंपनीकडून या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. केंद्र शासनाकडून ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रोला 12 हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे.

या प्रकल्पाला आता ठाण्यातील काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन सिटीझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्स्पोर्ट एक्स्पोर्ट या संस्थेच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प पर्यावरणीयदृष्ट्या कसा हानिकारक आहे आणि खरंच या प्रकल्पाची ठाणेकरांना आवश्यकता आहे, यासंदर्भातील जनजागृती ही सर्व मंडळी करत आहेत. हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच काही पर्यावरणप्रेमी आणि नगर तज्ज्ञांनी या प्रकल्पावर काही महत्वपूर्ण आक्षेप घेतले असून यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

काय आहेत आक्षेप?

वर्तुळाकार मेट्रोची एकूण 22 स्थानके प्रस्तावित असून यामध्ये घोडबंदर मार्गावर असणाऱ्या स्थानकांसाठी मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल केली जाणार असून पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे.

लोकमान्य नगर, रायलादेवी, वागळे या भागात स्थानकांची निर्मिती करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने नागरिकांच्या स्थलांतराचा देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

मेट्रो 4 प्रकल्प हा सुरू झाल्यानंतर ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रोची आवश्यकता नसून केवळ ठाणेकरांच्या माथी हा प्रकल्प मारला जात आहे. मोनो प्रमाणेच वर्तुळाकार मेट्रोचा प्रकल्प बासनात गुंडाळावा लागण्याची भीती शहर नियोजन तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT