ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणातील तक्रारदारांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातच आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या लाचप्रकरणातील तक्रारदारांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 2 ऑक्टोबर 2025 रोजी लाचप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणे एसीबीचे अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष शिंदे हे करत आहेत. तपासणी अधिकारी म्हणून 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी तक्रारदारांना एसीबी कार्यालयात बोलण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार हे दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आले.
तपास अधिकारी शिंदे यांच्या कार्यालयात तपासाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. याचदरम्यान तक्रारदारांना दुपारी 3 वाजून 48 मिनिटांनी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मात्र तक्रारदार आणि तपास अधिकारी शिंदे यांच्यात चर्चा करत असल्याने त्यांनी तो फोन उचलला नाही. म्हणून तत्काळ त्याच नंबर वरून 3 वाजून 49 मिनिटांनी पुन्हा फोन आला. फोन रिसिव्ह केल्यानंतर समोरील इसमाने हिंदी संभाषण करत तक्रारदारांना ऑफिसमध्ये घुसून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याचदरम्यान फोन कट केल्यावर पुन्हा फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लाचखोर माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांना जामीन मंजूर
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांना अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयातपाटोळे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली . त्यानंतर त्यांना जामीन मंजुर झाला असून पाटोळे उद्या कारागृहाबाहेर येणार आहेत. दरम्यान, पाटोळे आता कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. नौपाड्याच्या एका खासगी जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी बिल्डरकडून 60 लाखांच्या लाचेची मागणी करीत 25 लाखांची लाच स्विकारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांच्यासह ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे यांना अटक केली. यापूर्वी शंकर पाटोळे यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला होता.