ठाणे : ठाणे महापालिकेचे लाचखोर माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून गुरुवारी देखील पाटोळे यांच्यासह दोघांना जामीन मिळू शकला नाही. एवढ्या मोठ्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत उद्या लाचलुचपत विभागाच्या अधीक्षकांना बोलवा नाहीतर तुमच्यावर गांभीर्याने कारवाई करावी लागेल, या शब्दात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी सरकारी वकील आणि तपास अधिकार्यांना न्यायालयात सुनावले. त्यामुळे शंकर पाटोळे यांचा जेलमधील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
लाचप्रकरणात तुरुंगात असलेले ठाणे महापालिकेचे माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह या प्रकरणातील ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार होती. बुधवारी न्यायमूर्ती न आल्याने तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. हे प्रकरण ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याने या प्रकरणाचा तपास सध्या ठाणे लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून सुरू आहे.
गुरुवारी पुन्हा हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयाच्या समोर आले. त्यावेळी सरकारी वकील आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी यांच्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे अक्षरशः भडकले. सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी तपास अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. हे प्रकरण एवढे गंभीर असताना पोलीस निरीक्षक कसा तपास करू शकतो. यांना तर इन्व्हेस्टिगेशन हा शब्द पण उच्चारता येत नाही. उद्या अधीक्षकांना बोलवा नाहीतर तुमच्यावर गांभीर्याने कारवाई करावी लागेल असे असे खडे बोल न्यायमूर्तींनी सरकारी वकील आणि तपास अधिकार्यांना सुनावले. त्यामुळे पाटोळे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.