Bhiwandi Wada Road Traffic Congestion
भिवंडी: भिवंडी-वाडा महामार्गावर शनिवारी (दि.२६) सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शेलार ते सुपेगावपर्यंत तब्बल ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दीड तासापासून वाहतूक कोंडी कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी, चाकरमानी, व्यापारी, भाजीपाला आणि दूध विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
भिवंडी-वाडा महामार्गावरील शेलार ते सुपेगाव दरम्यान सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अंबाडीपर्यंत महामार्गाच्या एका लेनचे काँक्रिटीकरण झाल्याने सध्या दोन्ही दिशेची वाहतूक एका लेनवरून सुरू आहे. त्यातच मोठ्या अवजड वाहनांची सतत ये-जा आणि काही वाहनचालकांकडून होणाऱ्या बेशिस्त वाहनचालकामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर जाणारे चाकरमानी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते तसेच व्यापारी यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे.विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घटनास्थळी वाहतूक पोलिस किंवा संबंधित अधिकारी दिसून न आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.