Two Wheeler Accident Bhiwandi
भिवंडी : भिवंडी शहरातील एसटी बस डेपोसमोर सोमवारी (दि.२) झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय रितिकेश कमलाकर पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य दोन तरुण जखमी झाले. स्टीलने भरलेल्या ट्रेलरखाली दुचाकी चिरडल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, डुंगे गावचा रहिवासी असलेला रितिकेश पाटील हा भिनार येथे काम संपवून आपल्या दोन मित्रांसह घरी परतत होता. तिघेही एकाच दुचाकीवरून भिवंडी एसटी बस डेपोसमोर आले असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि स्टीलने भरलेल्या ट्रेलरमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दुचाकीचा तोल गेला. यावेळी दुचाकी ट्रेलरखाली गेल्याने रितिकेशचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीवरील अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून अपघातग्रस्त ट्रेलर ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी करणे आणि अवजड वाहनांमुळे अरुंद होणारे रस्ते यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.