Sit Probe Tet Paper Leak
भिवंडी : २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच डीएड उत्तीर्ण प्राथमिक शिक्षक यांच्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षेचा पेपर भिवंडीतून फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे २८ जून रोजी राज्यात टीईटी परीक्षा होणार होती .परंतु त्याच्या २४ तास आधी भिवंडीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघा संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी केली असता त्यांच्या जवळील प्रश्न हे २०२६ मध्ये होणाऱ्या टी ई टी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सारखे असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या तिघांना विरोधात कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ.पवन बनसोड यांना 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी भिवंडीत काही जण येणार असल्याची गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पोलीस पथकाने कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतले.
ज्यांच्याकडे टीईटी परीक्षेचे चार प्रश्नपत्रिका संच आढळून आले आहेत. पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अधिकारी यांना बोलावून या प्रश्नपत्रिका पेपर संदर्भात तपासणी केली असता हे प्रश्नसंच 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचेचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
यामध्ये एक जण हरियाणाचा तर दोन जण बिहार येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे हे तिघेही या टीएटी परीक्षेचा पेपर दिल्ली येथून घेऊन भिवंडी या ठिकाणी दीड कोटी रुपयांना हा पेपर विक्रीसाठी घेऊन आले होते अशी माहिती समोर आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.
या तिघा आरोपीं पैकी एक आरोपी हा केंद्रीय विद्यालयात नोकरी लावण्या साठी पैसे घेतले होते. तर एक जण केंद्रीय परीक्षेत नापास झालेला आहे, अशी माहिती दुधे यांनी दिले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस तपास पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, नऊ पोलिस निरीक्षक व २० कर्मचारी असणार आहेत.
या शिवाय विशेष पथक राज्यात ठिकठिकाणी तपासासाठी रवाना झाले आहेत. या टोळीचा सूत्रधार फरार असून त्यांनी पेपर नक्की कोठून बाहेर काढला. अजून किती ठिकाणी पेपर विक्री केला आहे का? त्यामध्ये काही शिक्षक व इतर कोण सहभागी आहेत का? याचा तपास या पथकाकडून सुरू करण्यात आला आहे.