Thane Bhiwandi Metro Pudhari
ठाणे

Thane Bhiwandi Metro: ठाणे-भिवंडी, दहिसर-भाईंदर मेट्रोचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात

भिवंडी मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी; काशिगाव-मॅक्सस मॉल टप्पा डिसेंबरअखेर सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर/भिवंडी: ठाणे, भिवंडी आणि मिरा-भाईंदरकरांसाठी मेट्रोच्या प्रतीक्षेतील आनंदाची बातमी आहे. ठाणे ते भिवंडी मेट्रो मार्गावर मंगळवारी प्रत्यक्ष रेल्वे चाचणी घेण्यात आली, तर दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्पातील काशिगाव ते मॅक्सस मॉल या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे.

हा टप्पा डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने आमदार नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वर्षअखेरीस ठाणे-भिवंडी आणि मिरा-भाईंदरच्या प्रवाशांना मेट्रो प्रवासाची सुविधा मिळण्याच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प ५ अंतर्गत ठाण्यातील कापूरबावडी ते भिवंडीतील धामणकर नाका या सुमारे साडेतेरा किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर मंगळवारी सायंकाळी मेट्रो प्रकल्पाच्या वतीने प्रत्यक्ष रेल्वे चाचणी घेण्यात आली. यावेळी मेट्रो प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी रेल्वेतून प्रवास करत चाचणीची पाहणी केली.

सहा डब्यांच्या या मेट्रो ट्रेनची लांबी १३६ ते १३८ मीटर असून, प्रत्येक डब्यात सुमारे ५० प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आहे. त्यानुसार एका ट्रेनची आसनक्षमता ३०० प्रवाशांची असणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ही मेट्रो सेवा सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

दुसरीकडे, दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प ९ अंतर्गत काशिगाव ते मॅक्सस मॉल (भाईंदर पश्चिम) या दुसऱ्या टप्प्याच्या कामानेही अंतिम टप्पा गाठला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित अधिकाऱ्यांसोबत या मार्गाची पाहणी केली.

स्थानकांची आणि मेट्रो मार्गाची बहुतांश कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

मात्र, हा टप्पा सध्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत न जाता मॅक्सस मॉल स्थानकापर्यंतच सुरू होणार आहे. पुढे बोस मैदानापर्यंत मेट्रो नेण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे.

कोंडीपासून दिलासा...

ठाणे-भिवंडी आणि दहिसर-भाईंदर या दोन्ही मेट्रो मार्गांवरील कामे निर्णायक टप्प्यात पोहोचली आहेत. चाचण्या, उर्वरित कामे आणि आवश्यक तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास डिसेंबरअखेर या दोन्ही भागांतील प्रवाशांना मेट्रोची भेट मिळू शकते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी, प्रवासाचा वाढता वेळ आणि लोकलची गर्दी यांपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT