Barvi Dam Water Level
डोंबिवली : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. गुरूवारी (दि.२) सकाळी सात वाजता धरणातील पाण्याची पातळी ५७.८० मीटर नोंदविण्यात आली आहे. धरणाची पूर्ण पातळी ७२.६० मीटर असून सध्या धरणात ७६.०७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या २२.४५ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार गुरूवारी सकाळी सातपर्यंत धरण क्षेत्रात ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २३६ मिलिमीटरवर पोहोचला आहे. सध्या सिंचनासाठी पाण्याची मागणी शून्य असून जलविद्युत निर्मितीसाठीही पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही.
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींना बारवी धरणाचे पाणी वितरित केले जाते. एमआयडीसीच्या अखत्यारीत असलेले बारवी धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरून वाहण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्षभर उद्योग आणि पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होते. यंदा कडक उन्हाळ्यामुळे बारवी धरणाची पाणी पातळी पार घसरली होती. जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील साठा समाधानकारक नव्हता. मात्र संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत चालल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा
गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजेच २ जुलै २०२५ रोजी धरणातील पाण्याची पातळी ६६.२५ मीटर होती. तेव्हा उपयुक्त पाणीसाठा १८८.२७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५५.५६ टक्के होता. गेल्या वर्षी आजपर्यंत ११४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा पाऊस आणि पाणीसाठा दोन्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मात्र जुलै महिना सुरू झाल्याने पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.