Barvi Dam  
ठाणे

Barvi Dam Gate Leakage | बारवीच्या चार स्वयंचलित दरवाजांना गळती; धरणातील साठा ८० टक्केवरच

बारवीच्या चार स्वयंचलित दरवाजांना गळती; धरणातील साठा ८० टक्केवरच

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून पाण्याची गळती सुरू असल्याचे समोर आले आहे. धरण सध्या ८०.७६ टक्के भरले असून चार स्वयंचलित दरवाज्यांमधून पाणी झिरपत आहे. त्यापैकी दोन दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे धरणाच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होत असून जलसुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब गंभीर मानली जात आहे.

एमआयडीसी प्रशासनाने गळतीची दखल घेत तातडीने दुरुस्ती केली जाईल, तसेच धरण किंवा दरवाज्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पावसाची अनिश्चितता आणि एल निनोचा प्रभाव लक्षात घेता वेळेत देखभाल का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. बारवी धरणाची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक आणि नागरी पाणीपुरवठ्यासाठी केली. १९७२ मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर २०१९ मध्ये धरणाचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यानंतर धरणाची साठवण क्षमता ३४०.४८ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढली. सध्या धरणात २५८.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून पाण्याची पातळी ६२.७० मीटर आहे.

यंदा मान्सूनला उशिरा सुरुवात झाल्याने धरणे अपेक्षित वेगाने भरलेली नाहीत. अशा परिस्थितीत धरणातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना स्वयंचलित दरवाज्यांमधून सुरू असलेली गळती चिंतेत भर घालत आहे. दोन दरवाज्यांमधून सातत्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बारवी धरणातून बाहेर पडणारे पाणी पुढे उल्हास नदीत मिसळते. पावसाळ्यात नदीत आधीच मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने सध्या गळतीमुळे बाहेर पडणारे पाणी कोणत्याही नियोजनाशिवाय वाहून जात आहे. त्यामुळे जलसंपत्तीचा हा अपव्यय तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, मोठ्या धरणांच्या स्वयंचलित दरवाज्यांची नियमित तपासणी, स्बर सीलची देखभाल आणि प्री-मान्सून तांत्रिक पाहणी वेळेवर होणे आवश्यक असते. या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास अशा प्रकारच्या गळतीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे केवळ गळती थांबविणे नव्हे, तर संपूर्ण गेट यंत्रणेचे तांत्रिक परीक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे

आजची धरणांतील पाणीसाठा स्थिती -

धरण (पाणीसाठा)

बारवी - ८०.७६

भातसा - ८६.७६

तानसा - ९८.४९

मोडकसागर - १००,००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT