ठाणे : गरबा खेळण्याच्या बहाण्याने आणि काहीही न सांगता घरातून श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन तर मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत. वाढत्या बेपत्ता अल्पवयीन मुलींच्या प्रकाराने पालक वर्गात घाबरहाटीचे वातावरण आहे. मागील महिन्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल 89 मुली बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. तर यापैकी 57 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश लाभलेले आहे.
26 आणि 27 सप्टेंबर, 2025 रोजी घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींमध्ये महाविद्यालयात विद्यार्थीनींचा समावेश आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातून बेपत्ता झालेल्या आणि इयत्ता 9 वी मध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांचे निधन झाल्याने मुलगी मामाकडे राहते. 27 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गरबा खेळण्यासाठी जाते सांगून घरातून निघाली ती घरी आलीच नाही. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात 27 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत शाळेत शिकणार्या आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकवर्ग हवालदिल आहे. तर बहुतांश मुली या प्रेम प्रकरणातून बेपत्ता होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात मागील ऑगस्ट 2025 या महिन्यात तब्बल 89 अल्पवयीन विविध कारणातून घरातून बेपत्ता झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांचा शोध घेत 57 मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे.
मुंब्रा हद्दीतून महाविद्यालयीन मुलीसह दोघी बेपत्ता
1) 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी त्या मुलीचे आई वडील गेले होते. त्यावेळी 14 वर्षीय मुलगी कोणालाही काही न सांगता, घरातून निघून गेली आणि परत न आल्याने तिच्या पालकांच्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
2) 27 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात इयत्ता 12 वीत शिक्षण घेणार्या मुलीने घरच्यांना सायबर कॅफेमध्ये जाते सांगून घरातून गेली ती परत आलीच नाही. दोन्ही प्रकरणातील अपहृत मुलींच्या पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.