UAE Pudhari
ठाणे

Thane Citizens Stranded UAE: इराण-इस्रायल युद्धाचा फटका; ठाण्यातील 23 नागरिक दुबईत अडकले

विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास अनिश्चित; 12 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश, कुटुंबीयांची मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील 23 नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक 23 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. नियोजित वेळेनुसार रविवारी भारतात परतणार होते. परंतु, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्याने परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.

दुबईत अडकलेल्या नागरिकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर व मुरबाड तालुक्यातील प्रवासी आहेत. त्यामध्ये एकूण 23 जणांपैकी 12 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक नातेवाइकांनी अद्याप तहसील कार्यालय किंवा पोलीस प्रशासनाशी अधिकृत संपर्क साधलेला नाही. मात्र, समाजमाध्यमांवर संदेश पसरल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तलाठ्यांना संबंधित कुटुंबांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुबईत अडकलेल्या पर्यटकांची नावे

एकनाथ धनके (67), गुलाब धनके (62), शिवराम वाळिंबे (63), शुभांगी वाळिंबे (59), केशव वेखंडे (70), कविता वेखंडे (61), मधुकर पाटील (72), मीनाक्षी पाटील (64), बाळू गायकर (70), वनिता गायकर (68), दशरथ हरड (74), शारदा हरड (65), किसन मोहपे (70), मीरा मोहपे (62), परशुराम गायकवाड (61), शुभांगी गायकवाड (53), रमेश धलपे (60), लता धलपे (52), वासुदेव शेलार (70), सपना शेलार (62), करुणा कापरे (59), अनिता धनके (71) तसेच टूर मॅनेजर मनीष सानप (49) यांचा समावेश आहे. तातडीने मदत करून सुरक्षितपणे मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

प्रवाशांचे व्हिसा अपग्रेड; हॉटेलमधील मुक्कामही मोफत

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आखातात अडकून पडलेल्या प्रवाशांचे व्हिसा अपग्रेड करून हॉटेलमधील त्यांचा मुक्कामही मोफत करण्याच्या सूचना अबुधाबीच्या पर्यटन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे विमान सेवेअभावी खोळंबलेल्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने हॉटेल आस्थापनांच्या सर व्यवस्थापकांना शनिवारीच तसे पत्र पाठवून या प्रवाशांची बिले प्रशासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुबईतील खास सूत्रांनी ही माहिती दिली. हवाई हल्ल्यांमुळे दुबईतील विमानतळाचे नुकसान झाले असून, शनिवारी दुपारनंतर दोन्ही विमानतळ बंद करण्यात आले. रात्री झालेल्या हवाई युद्धानंतर रविवारी सकाळपासून हल्ल्यांची तीव्रता कमी झाली असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस घरून काम करण्याचे आदेश दुबईच्या मानव संसाधन आणि अमिरातीकरण मंत्रालयाने जारी केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT