Thane Police suspended
ठाणे : पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कारागृहातून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन कैदी पळून गेले होते. याप्रकरणी ठाणे आयुक्तालयातील नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. या पोलिसांची ड्युटी लावणारे पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार शिवाजी भारत गर्जे आणि स्वार्थापोटी खोटे अहवाल लिहिणाऱ्या दत्तात्रय नामदेव जाधव यांनाही मंगळवारी (दि.१९) निलंबित करण्यात आले. या गंभीर प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिसांची एकूण संख्या ११ वर पोहोचली असून ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सात कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ४ ऑगस्ट रोजी नेण्यात आले होते. त्यापैकी रिक्षातून जात असताना दोन कैद्यांनी पोबारा केला. याप्रकरणी या कैदी पार्टी प्रमुख असलेले पोलिस हवालदार गंगाराम घुले, गिरीष भिकाजी पाटील, विलास जगन्नाथ मोहिते, किशोर शिर्के, अशोक विश्वंभर मुंडे, संदिप सुर्यकांत खरात, सुनिल दिनकर निकाळजे, भरत संग्राम जायभाये, विक्रम आनंदा जंबुरे या पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते. या निलंबित नऊ पोलिसांना कैदी पार्टीची ड्युटी लावणारे एनसीओ आणि दुय्यम पर्यवेक्षीय अशी जबादारी असलेले पोलीस हवालदार शिवाजी गर्जे यांचे आज निलंबन करण्यात आले. त्यांच्यावर स्वतःच्या मर्जीतील आठ पोलिसांना कैदी पार्टीची ड्युटी देणे, संगनमताने, बेकायदेशीरपणे रिक्षातून घेऊन जाण्यास सहकार्य करणे आणि कैद्यांना विशेष सेवा पुरविण्याचा ठपका ठेवण्यात आला.
दुसरीकडे, मुख्यालयातील ड्युटी बटवडा अंमलदार दत्तात्रय नामदेव जाधव यांनी ४ ऑगस्ट रोजीच्या नोंदवहीत फेरफार केल्याचे उघड झाले. हवालदार योगेश शेळके यांच्या नियुक्तीबाबत त्यांनी खोटी माहिती दिल्याचे बाब उघड झाली आहे. दिवंगत मनसुख हिरेन यांच्या निवासस्थानाच्या गार्ड ड्युटीच्या नोंदीतील रिकाम्या जागेत अतिरिक्त नोंद करून खोटा दस्तऐवज त्यांनी तयार केला. हे तपासात उघड झाल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोडे यांनी त्यांचेही निलंबित केले. या प्रकरणामुळे पोलिस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवालदार जाधव यांनी शेळके यांना कोणत्या कर्तव्यावर नेमण्यात आले होते, याची विचारणा करण्यात आली असता ते शीट पडताळणी साठी जाणार असल्याचे सांगतिले होते. त्यांच्याकडे बटवडा रजिस्टर मागण्यात आले असता जाधव यांनी दिवंगत मनसुख हिरेन यांच्या निवासस्थानी गार्ड रवाना या नोंदीच्या रिक्त असलेल्या जागेवर शीट पडताळणी करता हवालदार शेलार यांना समज दिली अशी अतिरिक्त नोंद करून खोटा दस्तावेज तयार केला. हे तपासात उघड झाल्याने पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोडे यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.