TET paper leak investigation latest news
संजय भोईर
भिवंडी: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीनंतर आरोपींचे पुढचे लक्ष्य राज्य पात्रता परीक्षा (सेट) चा पेपर फोडण्याचे होते. या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रासह बिहार, आग्रा, दिल्ली आणि हरियाणापर्यंत पोहोचले आहेत. पुण्यातील एका सरकारी कर्मचाऱ्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. टीईटीचा पेपर फोडल्यानंतर सेट परीक्षेचा पेपर मिळवून तो उमेदवारांना विकण्याचा डाव आखण्यात आला होता.
पुण्यातील एका चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्याचा या रॅकेटमध्ये महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले असून, तो ५० हून अधिक उमेदवारांच्या संपर्कातआग्रा येथील छपाई केंद्रातून प्रश्नपत्रिका सुरक्षाव्यवस्था भेदून अवघ्या आठ हजार रुपयांत बाहेर काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर दलालांच्या साखळीतून हा पेपर भिवंडीपर्यंत पोहोचला. उमेदवार आणि खासगी शिकवणी वर्गांना तो तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा डाव होता.
छपाई केंद्रातील बाबूलाल आणि निकी या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना चकवा देत प्रश्नपत्रिका बाहेर काढून त्या सोनू कुमार दिवाकर आणि बिजेंद्र गुप्ता यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यापैकी १२ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याचा साथीदार सोनू कुमार दिवाकर याने पोलिसांचा दबाव वाढल्यानंतर भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केले.
दरम्यान, रॅकेटचे आर्थिक व्यवहार आणि त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी विशेष तपास पथकाने बिजेंद्र गुप्ता याला बिहारमधील समस्तीपूर येथे नेले आहे. पेपर नेमका किती उमेदवारांपर्यंत पोहोचला आणि या रॅकेटमागे आणखी कोणते चेहरे आहेत, याचा शोध सुरू आहे.
ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतींचा वापर
गँगने पोलिसांना सांगितले की ते केवळ छपाई कारखान्यातील ज्युनिअर कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून ऑफलाईन पेपरच फोडत नव्हते, तर ऑनलाईन परीक्षा केंद्रे मॅनेज करून उत्तरे पुरवण्याची तयारीही करत होते.