संजय भोईर
भिवंडी: महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्राचे कनेक्शन अखेर समोर आले आहे. भिवंडी पोलिसांनी सोलापूर येथून प्रकाश पवार याला अटक केली असून, या प्रकरणातील ही १६वी अटक आहे. पवार हा सोलापूरमध्ये पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणारी संस्था चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात सुरुवातीपासून उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा येथून आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात हा पेपर कोणाला विक्री केला जाणार होता, याबाबतचा तपास अद्याप सुरू होता.
आता सोलापुरातून प्रकाश पवारला अटक झाल्याने या प्रकरणाला महाराष्ट्रातील कनेक्शन मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याच्या चौकशीत प्रकाश पवार याचे नाव समोर आले.
पोलिसांच्या तपासानुसार, पवारने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कागदपत्रे नेमकी कोणत्या उद्देशाने देण्यात आली होती? पवारचा पेपरफुटीतील अन्य आरोपींशी नेमका काय संबंध आहे? तसेच महाराष्ट्रातील आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आहे? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
१५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
प्रकाश पवार याला मंगळवारी (११) भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पवारच्या अटकेनंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्राच्या दिशेने वळला आहे.
विद्यार्थ्यांची कागदपत्रे, त्यातील टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पेपर आणि मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ताच्या चौकशीत समोर आलेले पवारचे नाव यामुळे तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या साखळीत महाराष्ट्रातील आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे.
सोलापूरची ‘ध्रुव अकॅडमी’ रडारवर
प्रकाश पवार याची सोलापूर येथे ‘ध्रुव अकॅडमी’ नावाची पोलीस पूर्वभरती प्रशिक्षण संस्था आहे. सन २०१२ पासून तो ही संस्था चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेत केले जाते.
पोलिसांच्या तपासात पवारकडे २६ विद्यार्थ्यांचे पेपर आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी २० पेपर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे असल्याचे समोर आले आहे. यातील ५ पेपर टीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे असल्याच्या संशयावरून पवारला अटक करण्यात आल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी दिली.