भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात प्रतिबंधित वस्तूंचा पुरवठा कसा होतो आणि त्याला वेळोवेळी शासकीय यंत्रणा कशी पाठीशी घालते, हे प्रकार सतत घडत असताना आता नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या टर्मिव इंजेक्शन्स मीरारोड येथील एका जिम सप्लिमेंट विकणाऱ्या दुकानात खुलेआम विक्रीचा पर्दाफाश मनसेचे पदाधिकारी सचिन पोपळे यांच्या जागरूकतेमुळे झाल्याची बाब समोर आली आहे.
या इंजेक्शनचा साठा मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जिम सप्लिमेंट विकणाऱ्या दुकानातून जप्त करण्यात आला आहे. हे इंजेक्शन कमी रक्तदाब वाढविण्यासाठी दिले जाते. तसेच स्नायू दुखी शमविण्यासाठी, बुरशीचे संक्रमण रोखण्यासाठी देखील ते रुग्णाला दिले जात असले तरी या इंजेक्शनची विक्री करताना संबंधित ग्राहकाला डॉक्टरकडून देण्यात आलेली प्रिस्क्रिप्शन दुकानदाराकडून तपासणे बंधनकारक ठरते.
डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन असल्यासच हे इंजेक्शन ग्राहकाला अथवा रुग्णाला मेडिकल स्टोर्सद्वारेच विक्री केले जाते. मात्र या इंजेक्शनची विना प्रिस्क्रिप्शन खुलेआम तसेच जिम सप्लिमेंट विकणाऱ्या दुकानातून बेकायदेशीर विकले जात असल्याची माहिती सचिन यांना मिळाली. त्याबाबत त्यांनी मीरारोड पोलीस ठाण्याला कळवून पोलीस कर्मचाऱ्यांसह हे इंजेक्शन विकणाऱ्या दुकानात धडक दिली. त्यावेळी दुकानदाराची भंबेरी उडाली. त्याने सुरुवातीला या इंजेक्शनचा साठा आपल्याकडे नसल्याचा कांगावा केला.
दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार
यानंतर सचिन यांनी एका बॉक्समध्ये असलेली औषधे दाखविण्यास सांगितल्यानंतर त्यात टर्मिव इंजेक्शनची सुमारे 25 ते 30 बॉक्स वायल्स आढळून आल्या. त्यावेळी मात्र दुकानदाराने हि इंजेक्शन्स आपण घेत असल्याचा दावा केला. एवढ्या मोठ्याप्रमाणात हि इंजेक्शन दुकानदार वापरत असल्याचे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी इंजेक्शनच्या वायल्स जप्त करून त्या दुकानदारासह मीरारोड पोलीस ठाण्यात नेल्या.
पोलिसांनी त्या वायल्स ताब्यात घेत दुकानदाराला नोटीस देऊन सोडले. तर पुढील कारवाईसाठीच पोलिसांनी औषध निरीक्षकांना पाचारण केले. औषध निरीक्षकांकडून त्या जप्त वायल्सच्या विक्रीची तपासणी करून त्यांचा पंचनामा केल्यानंतरच संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिरा-भाईंदर शहरात मादक द्रव्ये खुलेआम विक्री होत असताना प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीने देखील मागील काळात जोर धरला होता. सध्या हे प्रकार बंद झाले नसले तरी ते छुप्या मार्गाने विकून शहरातील तरुणपिढी बर्बाद केली जात आहे. आता टर्मिव इंजेक्शनची जिम सप्लिमेंटच्या दुकानात बेकायदेशीरपाने नशेकरीता खुलेआम विक्री होत असून हि बाब अत्यंत संतापजनक आहे. त्यावर पोलिसांनी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे.सचिन पोपळे, मनसे विधानसभा अध्यक्ष
टर्मिव या इंजेक्शन प्रामुख्याने कमी रक्तदाब वाढविण्यासाठी रुग्णाला दिले जाते. मात्र त्याची विक्री मेडिकल स्टोर्सद्वारे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करता येत नाही. या इंजेक्शनमध्ये एमडी पदार्थाची मात्रा असल्याने रुग्णांना त्यामुळे गुंगीच्या माध्यमातून आराम मिळतो. त्याचा वापर नशेसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डॉ. नंदकिशोर लहाने