Teacher Property killed Case file photo
ठाणे

Teacher Property killed Case-संपत्तीसाठी आधी 'सही'... मग 'श्वास'च रोखला ! कोट्यवधींच्या संपत्तीसाठी 'मृत्यूचा करार'

Teacher Killed Over Property- स्वाक्षऱ्या घेऊन शिक्षिकेची हत्या

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सुरेश साळवे

संपत्तीचा हव्यास माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय कल्याणमध्ये आला आहे. आयुष्य-भराच्या कष्टातून कोट्यवधींची संपत्ती जमविणाऱ्या एका अविवाहित शिक्षिकेच्या मालमत्तेवर डोळा ठेवून तिच्या हत्येचा कट रचण्यात आला. वारसदार नसल्याचा फायदा घेत संपत्ती हडपण्याचा डाव आखला गेला.

आधी या महिलेला ठाण्यातून नाशिकला नेण्यात आले. तेथे संपत्तीच्या वारसाहक्काशी संबंधित कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आणि त्यानंतर नाक-तोंड दाबून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला. हत्या केल्यानंतर मृतदेह सिन्नर-घोटी मार्गालगत फेकून देण्यात आला. मात्र, गुन्हा करूनही आरोपींचा माग लपला नाही.

सीसीटीव्ही चित्रण, मोबाईल तंत्रज्ञान व तांत्रिक तपासाच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेने या खुनाचा छडा लावत दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका 'सुषमा' (५३, नाव बदललेले) या १४ जुलै रोजी कामानिमित्त ठाण्याला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र, दिवस उलटला, रात्र झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत.

कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही. अखेर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुषमा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला ही केवळ बेपत्ता होण्याची घटना वाटत असली तरी पुढील दोन दिवसांत या प्रकरणाने थेट हत्येचे स्वरूप घेतले.

या शिक्षिका एलआयसी एजंट म्हणूनही काम करीत होत्या. अविवाहित असलेल्या या शिक्षिकेने कष्टातून मोठी संपत्ती उभी केली होती. मात्र, त्यांना थेट वारसदार नव्हता. याच गोष्टीची माहिती आरोपींना होती. वारसदार नसल्याने त्यांच्या संपत्तीवर सहज कब्जा करता येईल, असा समज करून आरोपींनी संपत्ती हडपण्याचा कट रचल्याचा तपासात उलगडा झाला. मात्र, संपत्ती आपल्या नावावर करून घेण्यापूर्वीच शिक्षिकेचा काटा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तपासातून पुढे आले. दरम्यान, सदरची शिक्षिका बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच १६ जुलै रोजी नाशिक ग्रामीण भागातील वाडीवन्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिन्नर-घोटी मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. तपासाची सूत्रे जोडली गेली आणि नाशिकमध्ये आढळलेला मृतदेह या शिक्षिकेचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वाडीवन्हे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवि-रोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह सापडल्यानंतर या घटनेमागील कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. कल्याण गुन्हे शाखेने शिक्षिका बेपत्ता झाल्याच्या दिवसापासून त्यांच्या प्रत्येक हालचालीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्या घरातून बाहेर पडल्यानंतर कुठे गेल्या, कोणाच्या संपर्कात आल्या, त्यांना कोण भेटले आणि ठाण्यातून त्या नाशिकपर्यंत कशा पोहोचल्या, याचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रण तपासले. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे संशयाचे धागे 'संतोष' आणि 'सुहास' (नावे बदललेली) यांच्यापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी शिक्षिकेच्या संपत्तीच्या वारसाहक्काशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या.

संपत्ती मिळविण्याच्या या डावातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुषमा यांची नाक-तोंड दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यालगत टाकून दिला. शिक्षिकेच्या कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता. तर दुसऱ्या बाजूला आरोपींनी संपत्ती हडपण्यासाठी आखलेला रक्तरंजित कट लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोर्पीच्या या कटाला पोलिसांच्या तांत्रिक तपासाने छेद दिला. पोलिसांचा संशय बळकट होत गेल्याने. अखेर संतोष व सुहास यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करून पुढील तपासासाठी सिन्नर, नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांच्या तपासाने मुखवटा फाडला

ज्या संपत्तीसाठी एका महिलेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे, ती संपत्ती आरोपींच्या हाती लागली की नाही, हा प्रश्न तपासाचा भाग असला तरी या प्रकरणात त्यांच्या नशिबी आले ते मात्र थेट कारागृहाचे दार. संपत्तीच्या कागदावर सही मिळविण्याचा डाव यशस्वी झाला असे वाटत असतानाच, पोलिसांच्या तपासाने कटाचा मुखवटा फाडला. संपत्तीच्या हव्यासापोटी रचलेला हा रक्तरंजित डाव आरोपींनाच महागात पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT