बोईसर: तारापूर एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या कामांचा ‘डोंबाऱ्याचा खेळ’ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे अवजड वाहनधारक, उद्योगधंदे आणि कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तारापूर एमआयडीसी हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा असल्याने येथे दररोज हजारो ट्रक, ट्रेलर व इतर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, तयार मालाची वाहतूक यासाठी या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते.
मात्र, सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून ते वेळेत पूर्ण केले जात नसल्याने वाहनांची अक्षरशः कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे खोल खड्डे, चिखल आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, अवजड वाहने रस्त्यात अडकून पडण्याच्या घटना वाढल्या असून, काही ठिकाणी वाहनांना तासन्तास थांबावे लागत आहे. यामुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नाही, तर इंधनाचा खर्च वाढून उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे.
वाहतुकीचा वेग मंदावल्याने कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होत असल्याची तक्रार उद्योगांकडून केली जात आहे. अनेक कंपन्यांच्या मालवाहतुकीत उशीर होत असून, वेळेवर पुरवठा न झाल्यास करारभंगाची भीतीही व्यक्त केली जात आहे.याशिवाय, कामगारांना वेळेत कामावर पोहोचता न आल्याने उत्पादनक्षमता घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक, पर्यायी मार्ग किंवा सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याने अपघातांचा धोका वाढत चालला आहे.रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनांचा अभाव असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान एमआयडीसी प्रशासनाकडून काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता ठेकेदारांवर कडक कारवाई करून येथील कामाला गती देणे आवश्यक आहे.
तसेच, तात्पुरते पर्यायी रस्ते, योग्य दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था तातडीने उभी करणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘उद्योगनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारापूर एमआयडीसीमध्ये सुरू असलेली ही परिस्थिती उद्योगांच्या प्रगतीला अडथळा ठरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.