डोळखांब : दिनेश कांबळे
24 ऑक्टोबर रोजी शहापुरात ऑनलाईन वनपिंगळा संवर्धन दिन साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे शहरातील तानसा अभयारण्य परिसरात संकटग्रस्त वनपिंगळा या पक्ष्यांबरोबरच इतर 158 पक्ष्यांचे दर्शन नियमित होत असल्याने निसर्गप्रेमींमध्ये आकर्षण निर्माण होत आहे.
शहापूर तालुका हा अतिशय डोंगराळ व जंगल संपत्तीने नटलेला तालुका आहे. याठिकाणी तानसा, वैतरणा, भातसा यासारखी मोठाली जलाशये आहेत. त्यामुळे येथील पाणवठ्यावर पक्षी निरीक्षण गणनेमध्ये दुर्मिळ पक्ष्यांची नेहमीच नोंद होत असते. त्यामध्ये विशेषतः तानसा जलाशयाचे घनदाट जंगलात सध्या दुर्मीळ होत चाललेल्या वन पिंगळ्याच्या तीन महत्वाच्या प्रजातींपैकी संकटग्रस्त वन पिंगळा प्रजातीचा पक्षी आढळून येतो. तर पक्षी गणनेत पक्षांच्या इतर 158 जाती आढळून आल्या आहेत.
यामध्ये स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांच्या जातींचा समावेश असून वाटवट्या, माशिमार, दलदली ससाणे, बहिरा ससाणा, तुरेवाला सर्पगरूड, पिंगळा या विशेष पक्षांचा समावेश आहे. या पक्षांचे संवर्धनासाठी पक्षी निरीक्षक, वन विभाग व पक्षीशास्त्र विशेष काम करीत आहेत. तर नंदुरबार व मेळघाट जंगलात आढळणाऱ्या वन पिंगळ्याचे तीन प्रजातींपैकी तानसा अभयारण्य याठिकाणी संकटग्रस्त वन पिंगळा आढळून येतो हे विशेष महत्वाचे आहे.
विविध विषयांवर चर्चा
या निमित्ताने काल 24 ऑक्टोबर या वन पिंगळा संवर्धन दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लिंकद्वारे पक्षीप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन केलेे होते. यावेळी दुर्मिळ व संकटग्रस्त वन पिंगळा यांचे बाबत माहिती देण्यात आली. वन पिंगळाबाबत परिचय व ओळख, पश्चिम घाटातील दुर्मिळ वन पिंगळ्याचे पुनर्शोध, त्याचे महत्व, वन पिंगळ्याचे अधिवास, संरक्षण तसेच आवाहने, यासारख्या विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सैपुन शेख उप वनसंरक्षक (जव्हार) यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तर डॉ. गिरीश जठार (पक्षी शास्रज्ञ), सुनील लाड (पर्यावरण कार्यकर्ता) राहुल गवई उपवनसंरक्षक ठाणे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.