उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील तानाजी नगर परिसरात मध्यरात्री मोठी घटना घडली आहे. रात्री साडेतीनच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला चढवला.
आता माहितीनुसार एका गरबा कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पुनर्वसन हाणामारीत होऊन तानाजी नगर येथील तरुणाने दहा चाळ येथील तरुणाला मारहाण केली होती. याच बदला घेण्यासाठी दहा चाळ येतील तरुणांचा एक कॅम्प पाच मध्ये तानाजी नगर येथे रात्रीच्या सुमारास आला होता. मात्र तो तरुण न मिळाल्याने पुन्हा तीनच्या दरम्यान आला. त्यावेळी ही त्यांना तो तरुण मिळाला नाही. त्यामुळे चिडलेला सशस्त्र टोळक्याने चार मोटरसायकल, दोन रिक्षा, दोन टेम्पोसह आठ ते दहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
वाहनाच्या काचांसह पेट्रोल टाकी आणि मरगड आदीचा भुगा केला आहे. अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विपुल मयेकर यांनी तत्काळ हिललाइन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.