Tala Fort history Pudhari
ठाणे

Tala Fort history: तळा गावचा पुरातन इतिहास जपणारे तळ्याचे ‌‘वैजनाथ हरिहरेश्वर‌’

तळागडावर घरांचे, वाड्यांचे अवशेष; लाकडातील कोरीव घटपल्लव ठरताहेत मांगल्याचे प्रतीक

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

ठाणे: तळ्याचे वैजनाथ हरिहरेश्वराचा इतिहास जाणताना असे लक्षात येते की, कधी कधी गावाला नाव देताना सोपे उपाय योजलेले आढळून येतात. रोह्याजवळचं तळा गाव असेंच दिलेले दिसून येते. गावात आत्ता सुद्धा पाचसहा लहानमोठी तळी आहेत. गावच मुळात लहानसं. गावाचं स्थान अगदी समुद्र सान्निध्यात नसलं तरी मुरुड, मांदाड, कुडा या प्राचीन नगरांच्या आसपास असल्यामुळे साहजिक गावाचं पुरातत्व समजून घेणं सोपं जातं.

गावात एक किल्लाही आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर कातळात खोदलेली सात पाण्याची टाकी त्याच्या पुढे लक्ष्मी कोठार नावाची वास्तू पाहायला मिळते. तळागडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात. म्हणजे किल्ल्यावर बऱ्यापैकी वस्ती असावी. खाली गावातही असावी. किल्ल्यावरून घोसाळगड, मांदाड खाडी, कुडा लेण्यांचा डोंगर असा सर्व परिसर दिसतो.

खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने गडाचं अस्तित्व नेमलं गेलं असावं. किल्ल्याचा इतिहास आदिलशाही काळापासून ज्ञात असला तरी गडावरच्या खांब टाक्यावरून, टाक्यांच्या संख्येवरून आणि पडझड झालेल्या दरवाज्याच्या वर एकेकाळी असणाऱ्या शरभाच्या शिल्पावरून किल्ला आदिलशाही अगोदरपासून असणार अशी कालनिश्चिती करता येते.

सातवाहन काळाचं निदर्शक असणारं खांब टाकं आणि शरभ शिल्प या खुणांवरून तो सातवाहन काळात बांधला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिलाहार काळात पूर्ण अपरांतच त्यांच्या ताब्यात होता हे सर्वज्ञात आहे.

त्यामुळे किल्ला आणि गाव आपल्याला दुसऱ्या- तिसऱ्या शतकात घेऊन जाते. या प्राचीनत्वाचा शोध घ्यायचं कारणही तसं सबळ आहे. गावात चंडिका देवी, महादेव मंदिर आणि इतर अनेक मंदिरं आहेत. गावात फेरफटका मारताना काही गल्ल्या दिसतात. गावात पुसाटी तलाव, महादेवाचं तळं, मुडी तलाव, वैजनाथाचं तळं अशा नावाची तळी आजही दिसतात.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. 1735 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. तो पुढे इंग्रजांच्या हाती पडण्यापर्यंत स्वराज्यात होता. पेशवेकाळात महाराष्ट्रात मंदिर बांधणी मोठ्या प्रमाणावर झाली. तळा गावातही बांधलेली मंदिरं या काळात बांधलेली किंवा जीर्णोद्धारित असावीत.

गावातली सर्वात जुनी मंदिरं म्हणजे वैजनाथ, हरिहरेश्वर आणि चंडिका देवी. चंडिका ही ग्रामदैवत असल्याने तिची उपासना गावात, पंचक्रोशीत केली जाते. चंडिका इथे महिषासुरमर्दिनीच्या रूपात असून पायाखाली महिषाच्या रूपात राक्षस आहे आणि देवी एका हाताने त्याचं तोंड धरून दुसऱ्या हाताने भाला खुपसते आहे, अशी आवेशपूर्ण मूर्ती आहे.

मंदिरासमोरचा नंदी पेशवेकालीन मंदिराची साक्ष पटवतो. मंदिर पूर्वाभिमुख असून समोरच मोठं तळं आहे. मंदिराची आतली बाजू लाकडी खांबांवर आधारलेली आहे. कोकणात सहसा सर्रास दिसतो तसा इथेही गाभारा स्वतंत्र आहे. त्याचं छत घुमटीसारखं असून आत शिवलिंग आहे. गावाबाहेर स्थान असलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रम्य आहे.

देवळाबाहेर किल्ला दिसतो. या मंदिरावरून गावाबाहेर जाणाऱ्या मार्गावर आणखी विजनवासात डाव्या बाजूला वैजनाथाचं मंदिर आहे. हे मंदिर हरिहरेश्वरहून प्राचीन असावं. आडमार्गी असल्याने काहीअंशी दुर्लक्षित असं वैजनाथ मंदिर तळा गावाचा इतिहास पोटाशी दडवून आहे, असं भासतं. नंदीमंडप एखाद्या अर्धवर्तुळाकार घुमटीसारखा मंदिरा- बाहेर परिसरात आहे. काही वाड्यांची जोती येथे दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT