सापाड : योगेश गोडे
अठराशेच्या शतकात कल्याण शहरातील छोठेसे खेडे असणार्या तिसगावात स्वयंभू आदिमाया जारी-मरी माता प्रगट झाली. स्वयंभू आदिमाया प्रगट होताच बातमी वार्यासारखी चहूदिशेला पसरली. आणि गाव-खेड्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आदिशक्तीच्या दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी वाढू लागली. स्वयंभू आदिशक्ती नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती भक्तांच्या मनामनात कोरली गेली. अशा या आदिमाया शक्तीचा इतिहास हा मोठा रोमांचक आहे.
तिसगावची माता जरी मरी आई हे स्वयंभू कल्याणातील देवस्थान आहे. अठराशेच्या दशकात तिसगाव हे कल्याण पूर्वेतील एक लहानसे खेडे होते. या खेड्यात आगरी-कोळी समाजाची तुरळक वस्ती होती. त्याकाळी सकाळ-संध्याकाळ गुरे चरावयास नेणे हे महत्वाचे काम ग्रामस्थ करत असत. नेहमीप्रमाणे गुराख्यांनी गुरे चरण्यासाठी तिसगावा शेजारी कतेमनिवली डोंगरीवर नेले असता अचानक वादळ सुटले आणि गणा गायकवाड नावाच्या गुरख्याच्या कानात एक आकाशवाणी सदृश्य भास झाला, “मी देवी आदिमाया शक्ती” बोलत आहे. मी आपल्या गावांजवळील तलावात मध्यभागी पाषाण स्वरूपात आहे. मला वर काढ माझी स्थापना कर! घाबरलेल्या गणाने घडला प्रकार सवंगडयांना सांगितला. त्यांनी गावांतील पंच प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितले. यावर गावकर्यांची बैठक घेऊन गणाच्या म्हणण्यानुसार तलावात शोध घेण्यास काहीच हरकत नाही, असे ठरले.
दुसर्या दिवशी ग्रामस्थ गावांजवळील तलावात देवीचा शोध घेण्यासाठी उतरले. संपूर्ण तलावाचा शोध घेतला गेला, मात्र काहीही हाती लागले नाही. प्रसंगी गणाच्या डोळ्यासमोर तलावांत असलेली देवीची मूर्ती दिसत होती. वादळांत ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा गणाच्या कानावर आदळत होते. झोपेत चालणार्या माणसांप्रमाणे गणा चालत होता व तळ्याच्या मध्यभागी जाऊन त्याने तलावांत बुडी मारली आणि गणा पाण्यातून वर आला तो पाषाण स्वरूपातील देवीची मूर्ती घेऊनच. मूर्ती पाहून सर्वच ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. ग्रामस्थांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे देवीच्या नावाचा जयजयकार सुरू झाला. तिसाईची आई जरीमरी माता भक्तांचे श्रद्धास्थान बनली आहे.
भगत नेमण्याची प्रथा
देवीच्या जयजयकारांतच राघो गायकवाड याने उंच आरोळी ठोकून मंदिराच्या दिशने धावण्यांस सुरुवात केली. काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी गांवकरीही राघो गायकवाड पाठोपाठ मंदिराच्या दिशेने धावत सुटले. सायंकाळी कुलुप बंद केलेले मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले जावून आतमध्ये नमस्कार करीत असलेला राघो गायकवाड ग्रामस्थांना दिसला. चावीशिवाय मंदिराचे कुलुप दरवाजे कसे उघडले गेले, याचे सर्व ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. सर्व गावकर्यांनी एकमुखाने राघो भगताचा जयजयकार केला. अशा पद्धतीने देवीचा भगत नेमण्याची प्रथा गणा भक्तपासून रूढ झाली होती. आणि आजही ती पाचव्या भक्तपर्यंत सुरू आहे.
पंचानी दिले मूर्त स्वरूप
काही वर्षानंतर गणा भगत यांचा मृत्यू झाला. गावकर्यांपुढे देवीचा नवीन पुजारी कोण? हे ठरविणे अवघड होऊन गेले. एकाएकी चमत्कार झाला राघो गायकवाड नावाचा तिसगांव पाड्यावर राहणारा तिसगांवचाच रहिवाशी ग्रामस्थांकडे आला. त्याने सांगितले माझ्या शरीरामध्ये देवीचा संचार झाला असून मला देवीने भगत म्हणून राहण्याची आज्ञा केली आहे. यावर ग्रामस्थांनी अविश्वास व्यक्त करून त्याची परीक्षा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी पंचमंडळींची नियुक्ती करण्यात आली. पंचांनी एक योजना तयार करून तिला मूर्त स्वरूप दिले गेले.