

ठाणे : प्रवीण सोनावणे
आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या कळवा परिसरातून काही महिन्यांपूर्वीच आव्हाड यांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी पालिका निवडणुकीची गणिते आणखी सोपी करण्यासाठी या ठिकाणी विकासाची पायाभरणी करण्यात आली असून कळव्यातील नवीन नाट्यगृहासाठी 40 कोटी, नवीन क्रीडा संकुलासाठी 50 कोटी याशिवाय शहरातील इतर कामांसाठी असा एकूण 165 कोटींचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. हा निधी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना पालिका निवडणुकीसाठी पाठबळ देण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राजकीय धक्के देण्यात तरबेज असणार्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी मोठा धक्का दिला होता. जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असणार्या सात माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील या नगरसेवकांना गळाला लावण्यास अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच भाजपने देखील फिल्डिंग लावली होती. मात्र या सर्व माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत केला होता.
यामध्ये माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी महापौर मनोहर साळवी, अपर्णा साळवी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, मनाली पाटील, महेश साळवी, मनीषा साळवी, सुरेखा पाटील, सचिन म्हात्रे, प्रमिला केणी सुपुत्र समाजसेवक मंदार केणी यांचा समावेश होता. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळव्यात आता विकासाची पायाभरणी करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या या सर्व माजी नगरसेवकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कळव्यात एक नाट्यगृह व्हावे यासाठी अनेक वर्ष कळवेकरांचे प्रयत्न होते. ते आता प्रत्यक्षात साकार झाले असून या ठिकाणी नवीन नाट्यगृहासाठी 40 कोटी तर नवीन क्रीडा संकुलासाठी 50 कोटींचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेसाठी निवडणुकीची गणिते अधिक सोपी होण्याची शक्यता आहे.
कोणत्या कामासाठी किती निधी...
कळव्यातील नवीन नाट्यगृह - 40 कोटी
कळव्यातील नवीन क्रीडासंकुल - 50 कोटी
शौचालयांचे नूतनीकरण - 35 कोटी
शाळांच्या इमारतींचे मजबुतीकरण - 25 कोटी
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्ती - 5 कोटी
ठाणे पशुपालन गृह उभारणीसाठी - 1 कोटी