MSRTC extra buses Pudhari
ठाणे

MSRTC extra buses: उन्हाळी सुट्टीसाठी एसटीवर प्रवाशांच्या उड्या; कल्याणसह विठ्ठलवाडी आगारातून गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

या दोन्ही आगारांमध्ये एसटीच्या बसगाड्यांवर प्रवाशांच्या उड्या पडल्याचे दिसून येत आहे

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला चाप बसावा, यासाठी विठ्ठलवाडी आणि कल्याण आगारातून विविध मार्गांवर काही जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही आगारांमध्ये एसटीच्या बसगाड्यांवर प्रवाशांच्या उड्या पडल्याचे दिसून येत आहे

दरवर्षी उन्हाळी सुट्टीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. हेच लक्षात घेऊन विठ्ठलवाडी आगाराने रत्नागिरी, गुहागर, कोल्हापूर, देवरूख, दापोली आणि चिपळूण यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आगाराने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, विठ्ठलवाडीतून सकाळी आणि रात्रीच्या वेळी महत्त्वाच्या गाड्या सुटणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विठ्ठलवाडी ते रत्नागिरी, कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव, शिर्डी, तसेच खान्देशातील प्रवाशांसाठी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, आदी तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी विचारात घेऊन त्या मार्गावरही बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला चाप

सुट्ट्यांच्या काळात खासगी बस चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला चाप बसावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. एसटीने योग्य दरात आणि सुरक्षित प्रवासाची हमी दिल्याने प्रवाशांनी सरकारी बसेसना पसंती दिली आहे.

ऐन सुट्टीत गाड्या वाढवल्याने आम्हाला आरक्षणासाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली. कल्याण व विठ्ठलवाडी आगाराने केवळ स्वतःच्याच नव्हे, तर इतर आगारांतून येणाऱ्या गाड्यांचेही योग्य नियोजन केले आहे. वेळापत्रकाचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळी प्रवास प्रवाशांसाठी नक्कीच थंडावा देणारा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT