मुरबाड शहर : किशोर गायकवाड
तापत्या उन्हाळ्याची चाहूल लागताच ‘गारवा’ शोधणाऱ्या नागरिकांसाठी ऊसाचा रस हा जणू निसर्गाचा वरदानच ठरत आहे. उन्हाळ्यात गार रसामुळे घशाला दिलासा मिळत असून रस्त्याकडेच्या ऊसाच्या रस विक्रीतून संसाराला हातभार लागत आहे.
मुरबाड-म्हसा मार्गावर नगरपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका साध्या हातगाडीवरून मिळणारा रस हा केवळ तहान भागवत नाही, तर श्रमजीवी कुटुंबाच्या जगण्यालाही आधार देतो. एका हातगाडीवर छोटा चरखा आणि त्याला चालना देणारे पेट्रोल इंजिन, तर दुसऱ्या गाडीवर ग्लास, पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य अशी मांडणी दिसून येते.
अहमदनगर जिल्ह्यातून सुमारे 200 किलो ऊस ते दर आठवड्याला मागवला जातो. 12 ते 14 रुपये किलो दराने घेतलेल्या या ऊसावरील व्यवसाय 7 ते 8 दिवस चालतो. रसाचे दरही सर्वसामान्यांना परवडणारे ठरतात. या साध्या व्यवसायामागे खर्चाचे गणित मोठे आहे. लिंबाचा दर 200 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने खर्च वाढला आहे. त्यात बर्फ, पाणी, ग्लास यांचा खर्च वेगळाच.
चरखा चालवण्यासाठी लागणारे पेट्रोल इंजिन साडेतीन लिटर क्षमतेच्या टाकीवर दोन दिवस चालते. ऊसाचा चोथा हा काही ठिकाणी जनावरांसाठी उपयोगी पडतो, पण येथे तो फेकून द्यावा लागत असल्याने त्याचाही अतिरिक्त खर्च होतो. तरीही, उन्हाच्या कडाक्यात ग्राहक रसाचा आस्वाद घेताना दिसतात, हीच या कुटुंबासाठी समाधानाची बाब आहे.
कृत्रिम शीतपेयांमुळे दुर्लक्ष...
ऊसाचा रस हा केवळ थंड पेय नसून शरीराला ऊर्जा देणारा, पचनास मदत करणारा आणि उष्णतेतून ताजेतवाने करणारा नैसर्गिक पर्याय आहे. मात्र, आधुनिक काळात कृत्रिम शीतपेयांच्या वाढत्या प्रभावामुळे अशा पारंपरिक, नैसर्गिक पेयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते. एकीकडे कोल्ड्रिंक्सचा खप वाढतो आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ऊसाला अपेक्षित बाजारपेठ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही दुहेरी वास्तवता चिंताजनक आहे.
शेतकऱ्यांना बळ मिळेल...
मुरबाडमध्ये उन्हाळ्यामध्ये आरोग्यदायी ठरणारे आणि नैसर्गिक पर्याय म्हणून विशेषत: ऊसाच्या रसाला प्राधान्य दिल्यास, ग्राहकांचे आरोग्य तर सुधारेलच, शिवाय स्थानिक व्यवसाय आणि शेतकऱ्यांनाही बळ मिळू शकेल.