शिक्षणाचा प्रवास म्हणजे दररोजचा एक धोक्याचा आणि जीवघेणा अडथळा बनला आहे Pudhari News Network
ठाणे

Struggle For Education | डहाणूच्या गांगोडी कुंडपाड्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास

शिक्षणाचा प्रवास म्हणजे जीवघेणा अडथळा

पुढारी वृत्तसेवा

कासा (ठाणे) : डहाणू तालुक्यातील गांगोडी कुंडपाडा या आदिवासी वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवास म्हणजे दररोजचा एक धोक्याचा आणि जीवघेणा अडथळा बनला आहे. येथे आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा अपुर्‍या असून पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते.

कुंडपाडा येथे सुमारे 100 ते 150 घरांची लोकसंख्या असून बहुतांश नागरिक हे शेतमजुरी आणि जंगलाधारित उपजिविकेवर अवलंबून आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जायचे असेल तर त्यांना जवळील सायवन गावातील शाळांमध्ये जावे लागते. मात्र, या प्रवासात त्यांना एक मोठी अडचण भेडसावते म्हणजेच स्थानिक नदीवरील धोकादायक बंधारा.

पावसाळ्याच्या दिवसांत ही नदी दुथडी भरून वाहते आणि बंधार्‍यावरून पाय ठेवणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे असते. अनेकदा पाणी पायथ्यापर्यंत येते आणि वार्‍याने थरकाप उडतो. छोट्या मुलांना मोठ्यांनी पाठीवर घेऊन तर काही वेळा दोघा-तिघांचा हात धरून या बंधार्‍यावरून पार करावे लागते. जर पाणी अधिक असेल तर शाळा सुटते. काही वेळा विद्यार्थ्यांना चकवा लावावा लागतो किंवा पायथ्याच्या बुटक्या झाडीतून धडपडत वाट काढावी लागते.

स्थानिक महिलांनी सांगितले की, सकाळी मुलं शाळेत जाताना जीव थरथरतो. पाणी जरा वाढलं की मुलांना पाठवायचं नाही असा निर्णय घ्यावा लागतो. पण शिक्षणही महत्त्वाचं आहे ना! ही परिस्थिती फक्त कुंडपाड्यापुरती मर्यादित नाही. डहाणूच्या अनेक आदिवासी वाड्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. दरवेळी निवडणुकांच्या आधी दिली जाणारी आश्वासनं आणि निवडणुकीनंतरचा विसर ही या भागातील जनतेची शोकांतिका बनली आहे.

स्थानिक पातळीवरील अधिकारी, पंचायत समिती सदस्य व जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांचे जीवित आणि शिक्षण याचा विचार करता येथे तातडीने सुरक्षित पुलाची गरज आहे. शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. मात्र, डहाणूच्या गांगोडी कुंडपाड्यासारख्या भागात आजही हा अधिकार जीव धोक्यात घालून मिळवावा लागत आहे. शासन आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा एखादा मोठा अपघात होईपर्यंत जाग येणार नाही, हीच भीती गावकर्‍यांना सतावत आहे.

प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT