डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : शिळ-डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेवर अत्याचार करुन खुन केल्याची घटना घडली होती. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेतली. हा खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता म्हात्रेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती केली.
शिळ गावाजवळील घोळ गणपती मंदिर परिसरात अक्षता कुणाल म्हात्रे (वय.30) विवाहितेवर तीन नराधमांनी अत्याचार केला आणि तिची हत्या केली. या घटनेनंतर ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे आणि त्यांच्या पथकाने शामसुंदर शर्मा (वय.62), संतोषकुमार मिश्रा (वय.45), राजकुमार पांडे (वय.45) या तीन संशयितांना या अटक केली आहे.
या प्रकरणी सासरच्या मंडळींकडून छळ झाला नसता तर अक्षतावर अशी वेळ आली नसती. त्यामुळे तिच्या मृत्यूला सासरची मंडळीही जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. पोलिसांनी अक्षताचे वडील शाळीक आगासकर (वय.58 रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांच्या फिर्यादीवरून पती कुणाल म्हात्रे, सासू मंदा म्हात्रे, नणंद दिपमाला कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.