बिहारमधील माजी मंत्री व विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे प्रमुख मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी यांची हत्या झाल्याचे आज ( दि. १६) सकाळी उघडकीस आले. दरभंगा जिल्ह्यातील बिरौल येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे.
मुकेश साहनी हे सध्या मुंबईत आहेत. त्यांना फोनवरुन वडिलांची हत्या झाल्याची माहिती देण्यात आली. ते मुंबईहून दरभंगाला रवाना झाले आहेत. दरभंगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रथमदर्शनी हे हत्येचे प्रकरण आहे. जितन साहनी हे घरात झोपले असताना चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही एक गंभीर घटना आहे. पोलीस ७२ तासांत या प्रकरणाची माहिती उघड करतील.गुन्हेगारीला याला आळा कसा घालायचा हे राज्य सरकारला माहीत असून, ते लवकरच मारेकर्यांपर्यंत पोहचतील, असा विश्वास भाजप नेते अजय आलोक यांनी व्यक्त केला.
मुकेश सहानी यांच्या वडिलांची हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 'एसआयटी' स्थापन करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएलच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली.