Rahuri Crime Pudhari
ठाणे

Thane Crime News: ठाण्यात गल्लीबोळातला गँगवार ठरतोय जीवघेणा; 5 महिन्यात पोलीस आयुक्तालय हद्दीत 30 हत्या तर 55 हत्येचे प्रयत्न

या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाण्यात गेल्या काही काळापासून गल्ली बोळातल्या भाईगिरीच्या वादातून हाणामारी, हत्येचा प्रयत्न, हत्या असे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. नुकतीच 31 मे रोजी शास्त्रीनगर नाका येथे भाईगिरीच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

त्यामुळे गल्लीबोळातले हे भाई पोलिसांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहेत. दरम्यान, मागील पाच महिन्यात ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत 30 हत्येच्या तर 55 हत्येच्या प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहर म्हणजे अस्सल मराठी माणसांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई सारख्या महानगराला खेटून उभे राहिलेल्या ठाणे शहराने आजही मराठी संस्कृती जपली आहे. साहजिकच मुंबईसारख्या महाकाय महानगरात राबणारे लाखो मराठी चाकरमानी आजही ठाण्यासारख्या सुसंस्कृत आणि शांततामय शहरात आपला निवारा स्थापण्यासाठी उत्सुक असतांना दिसतात.

मात्र गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा चेहरा झपाट्याने बदलत असून या शहरात दररोज हजारो लाखोंच्या संख्येने येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांनी ठाण्यास पुरते व्यापून टाकले आहे.

या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे ठाण्यातील गुन्हेगारी घडामोडीत वाढ दिवसेंदिवस होत आहे. असे असले तरी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. वाढते अमली पदार्थाचे गुन्हे रोखण्यासाठी तसेच संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ठाणे पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन ऑल आउट मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक गुंड, ड्रग्ज पेडलर्स, उपद्रवी टोळ्या, फरार चोरटे यांना पकडून गजाआड करण्यात आले आहे.

सहाजिकच पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैद्य धंद्यांवर मोठ्या प्रमाणात अंकुश लागला आहे. तर हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात तपासाची गती वाढवण्यात आल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल जलद होऊ लागली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी आदी शहरात जानेवारी ते मे 2026 या पाच महिन्यात 30 हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. तर याच कालावधीत 55 हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या सर्व गुन्ह्यातील आरोपींना देखील पोलिसांनी गजाआड केले आहे. गंभीर गुन्ह्याच्या तपासात स्वतंत्र पथक नेमून त्याचा तपास केला जात असल्याने असे गंभीर गुन्हे जलद गतीने उघड होतात अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाण्यातील लोकल भाईगिरी पोलिसांची डोकेदुखी

ठाण्यात मागील काळात झालेल्या काही हत्येच्या घटनांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. त्यात विष्णू नायर या तरुणाचा 31 मे रोजी पहाटे 2.45 वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर नाका येथे प्रकाश मारुती तिखे उर्फ पक्या, विकी मारुती तिखे, विकी करोतीया, सिद्धार्थ गौतम रोकडे, गणेश दिवे व इतर दोन अनोळखी व्यक्ती या साऱ्यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चाकूने भोसकून हत्या केली होती.

इस एरिया मे हमारी दादागिरी चलती है असे म्हणत विष्णू नायर यास खाली पाडून चाकूने त्याच्या पोटात व छातीत भोसकले होते. त्याच वेळी प्रकाश मारुती तिखे उर्फ पक्या सोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनी हातात तलवार व चाकू घेऊन इस एरिया मे हमारा राज चलता है असे म्हणत दहशत पसरवली व घटनस्थळावरून फरार झाले होते.

या घटनेमुळे ठाण्यात गल्लीबोळातला दिवसेंदिवस फोफावत जाणारा गँगवार जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. यापूर्वी देखील गल्लीबोळात भाईगिरी करणाऱ्या गुंडांकडून असे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे ठाण्यातील लोकल भाईगिरी पुन्हा एकदा पोलिसांची नवी डोकेदुखी ठरू पाहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT