Mumbra Fast Local Train Pudhari
ठाणे

Local Train Safety | लोकलमध्ये मृत्यूचा प्रवास थांबवा; मेल, एक्स्प्रेस मुंबई बाहेरून सोडा

चाकरमान्यांच्या जीवापेक्षा मेल-एक्स्प्रेस महत्त्वाच्या? प्रवाशांचा संतप्त सवाल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मुंबईची लाईफ लाईन असलेल्या उपनगरी लोकलमधील जीवघेणी गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात थांबवायचे असतील तर परराज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या मुंबई बाहेरून सोडाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली आहे. लोकलची संख्या वाढवणे हा एकमेव पर्याय असून त्यासाठी मुंबईतील फलाट मोकळे करणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दररोज प्रचंड गर्दी होते आणि याच गर्दीमुळे रोज प्रवाशांचे बळी जात आहेत. ठाण्याच्या पुढे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून लोकसंख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी ठोस प्रयत्न झालेले नाहीत. गेल्या काही वर्षांत फक्त काही महिला स्पेशल लोकल सोडल्या, ९ डब्यांच्या गाड्या १२ डब्यांच्या आणि आता बाराच्या १५ डब्यांच्या केल्या जात आहेत. परंतु त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रश्न सुटेल का हा खरा सवाल आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते कुर्ला अशी पाचवी आणि सहावी लाईन टाकण्यात आली आहे. कुर्ला ते सीएसएमटी पर्यंतचे काम रखडले आहे.

पूर्वी तिसरी आणि चौथी लाईनवरून मेल/एक्स्प्रेस आणि जलद लोकल धावत होत्या. पाचवी आणि सहावी लाईन झाल्यावर त्यावरून मेल/एक्स्प्रेस धावतील आणि तिसरी आणि चौथी लाईन जलद लोकलसाठी मोकळी होईल असे सांगण्यात आले होते. परंतु आजही तिसऱ्या आणि चौथ्या लाईनवरून बाहेरगावी जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस सोडल्या जात आहेत. मेल/एक्स्प्रेस वेळेत पोहोचण्यासाठी अनेक स्थानकांवर लोकल थांबवून चाकरमान्यांचा खोळंबा होतो आणि कामाच्या ठिकाणी लेटमार्क लागतो, अशी परिस्थिती कायम आहे. पूर्वी सीएसएमटी आणि दादर ही दोनच टर्मिनल होती.

आता लोकमान्य टिळक टर्मिनसही सुरू झाले. या तिन्ही टर्मिनसवर परराज्यात जाणाऱ्या गाड्यांसाठी नवीन फलाट वाढवले आहेत. मात्र त्याच काळात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाणाऱ्या पॅसेंजर आणि मेल/एक्स्प्रेस कोरोना नंतर बंद करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा, कर्नाटक आणि केरळसाठी आहेत. मुंबईतून दादर-सावंतवाडी, दिव्यातून दिवा-सावंतवाडी आणि दिवा-रत्नागिरी अशा फक्त तीनच गाड्या आहेत.

कोरोना पूर्वीची दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दादर-सावंतवाडीच्या जागी दादर-गोरखपूर गाडी सुरू करून कोकणवासियांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT