दुर्बलांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ‌‘सोशल बार्बर‌’  pudhari photo
ठाणे

Ravindra Birari : दुर्बलांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ‌‘सोशल बार्बर‌’

पाच हजारांहून अधिक निराधारांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : अजय शेलार

ज्याने आजवर आपल्या व्यवसायाकडे केवळ आर्थिक कमाईचे साधन न समजता समाजातील दुर्बल घटकांच्या आयुष्याला कलाटणी दिली, पाच हजारांहून अधिक निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. असा जर कुणी एका छोट्याशा कात्रीला समाज परिवर्तनाचं साधन बनवणारा मनुष्य असेल तर तो म्हणजे टिटवळ्याचा रवींद्र बिरारी होय.

2012 साली सुरू झालेल्या त्यांच्या उपक्रमाला आज तेरा वर्षे पूर्ण होत आली आहेत. या कालावधीत मुंबई आणि उपनगरांतील पाच हजारांहून अधिक निराधार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, भिकारी किंवा मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींना त्यांनी नव्या चेहऱ्याचा आणि नव्या जीवनदृष्टीचा स्पर्श दिला आहे. प्लॅटफॉर्मवर, ओसाड कोपऱ्यांत, फुटपाथवर किंवा अंधाऱ्या जिन्यांच्या पायऱ्यांवर विसावलेल्या या लोकांजवळ त्यांनी जाऊन केलेली केस-दाढी ही फक्त रूपबदलाची नव्हे, तर स्वाभिमानाची पुनर्स्थापना होती.

रेल्वे स्टेशनवर एके दिवशी नजरेस पडलेल्या अस्वच्छ, अस्ताव्यस्त अवस्थेतील व्यक्तींना पाहून त्यांच्या मनात मानवतेची ठिणगी पेटली आणि “यांना स्वच्छ करण्याची जबाबदारी माझीच,” असा विचार त्यांनी मनाशी पक्का केला. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यात भटकणाऱ्या व्यक्तींच्या केस-दाढी निस्वार्थभावाने करू लागले. आरशात स्वच्छ चेहरा पाहून एखाद्या दुबळ्या व्यक्तीच्या डोळ्यात चमकणारा आनंदहीच त्यांची खरी कमाई ठरली.

या सेवायज्ञात अनेकदा संकटांची झळही बसली. मनोरुग्णांकडून हल्ले झाले, जंतुसंसर्गाचा प्रसंग ओढवला, तब्येत खालावून वजनही दहा किलोने उतरले; पण मानवतेची हाक त्यांना एकदाही मागे फिरू देऊ शकली नाही. “त्यांचं रूप साफ करणं म्हणजे त्यांच्या जगण्याचा प्रकाश परत आणणं,” अशी श्रद्धा मनाशी बाळगत ते पुन्हा-पुन्हा मैदानात उतरले. त्यांच्यातील संवेदनशीलतेची उब इतकी खोल आहे की, केस-दाढी करताना ते त्या व्यक्तींशी बोलतात, त्यांच्या डोळ्यांतील भीती, लाज, दडपण हलके करतात आणि माणूस म्हणून त्यांना पाहिले जात असल्याची भावना निर्माण करतात.

त्यांचे कार्य केवळ शहरापुरते मर्यादित नाही. आदिवासी पाड्यांवर जाऊन ते मुलांना मदत करणे तसेच स्टेशनलगत राहणाऱ्या वृद्ध, अपंग आणि मानसिक रुग्णांना मदत करण्यासाठी अनेक वर्षे सातत्याने श्रम करतात.

मानवतेचा तेजस्वी चेहरा

त्यांच्या या निःस्वार्थ मानवसेवेचे कौतुक समाजातील दिग्गजांनीही केले आहे. दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, सिंधुताई सपकाळ, गौरी सावंत, अण्णा हजारे, सोनाली कुलकर्णी आणि अभिजित पानसे यांसारख्या अनेकांनी बिरारी यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे. आज पाच हजारांहून अधिक लोकांना नवा चेहरा आणि जगण्याची नवी दृष्टी देऊन त्यांनी सिद्ध केले आहे की सेवेसाठी पैसा नव्हे, तर हृदयात पेटलेली जाणीव आणि हातातली तयारी पुरेशी असते.

कात्री ही त्यांच्या हाती फक्त साधन असली तरी तिच्या धारेतून उमलणारी मानवता हजारो आयुष्यांना प्रकाश देत आहे. आणि या प्रकाशाचा वाहक म्हणून रवींद्र बिरारी आज संपूर्ण परिसरात मानवतेचा तेजस्वी चेहरा बनले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT