डोंबिवली : मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये सराफ व्यावसायिकाची 1 कोटी 62 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची ट्रॉली बॅग चोरणाऱ्या टोळीचा लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या पथकाने 4 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 किलो 98.500 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या लगड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
6 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.40 ते पहाटे 6.50 च्या दरम्यान ही घटना घडली. यातील फिर्यादी अभयकुमार मदनलाल जैन (52) हे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी/विक्री करतात. ते सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या कोच ए-1 मधून प्रवास करत होते. त्यांनी सीटखाली सोन्याचे दागिने असलेली ट्रॉली बॅग ठेवली होती. झोपेचा फायदा घेऊन चोरट्यांनी बॅग लंपास केली. याप्रकरणी अभयकुमार जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याण लोहमार्ग पोलिस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तैनात केलेल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्रांना वेग दिला.
चौघांकडून 1.62 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त
फुलचंद उर्फ परमेश्वर गुंजाळ याच्याकडून 35 लाख रुपये किंमतीची 250 ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड, पुणेकर उर्फ शिवण्या डिकोडे याच्याकडून 82 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीची 548.500 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, पुणेकर उर्फ शिवण्या डिकोडे याच्याकडून 45 लाख रुपये किंमतीची 300 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असे एकूण 1 कोटी 62 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीच्या 1 किलो 98.500 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 लगड्या हस्तगत करण्यात आल्या.
प्रवाशांना पोलिसांचे आवाहन
या कामगिरीत कल्याण, सोलापूर, कुर्डूवाडी रेल्वे पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दंगल नियंत्रण पथकाने सहकार्य केले. कोट्यवधी रूपयांच्या या सोन्याच्या चोरीमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर या गुन्ह्याचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.