श्रीकांत शिंदे  File Photo
ठाणे

Shrikant Shinde | खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठी आंतरराष्ट्रीय जबाबदारी

भारताचे जागतिक संबंध आणखी मजबूत करण्यात बजावणार महत्त्वाची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

Dr. Shrikant Shinde Parliamentary Friendship Group

डोंबिवली : कल्याण ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळामधील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर आणखी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये डॉ. शिंदे यांचीही निवड करण्यात आली आहे.

पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप हा उपक्रम केंद्र सरकारच्या ऑपरेशन सिंदूरनंतरच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचा पुढचा टप्पा मानला जात आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येऊन भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे.

भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध पक्षांतील खासदारांचा समावेश असलेले शिष्टमंडळ तब्बल ६४ देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

रविशंकर प्रसाद, पी. चिदंबरम, राम गोपाल यादव, टी. आर. बालू, सुप्रिया सुळे, शशी थरूर, अनुराग ठाकूर, असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, डेरेक ओ’ब्रायन, मनीष तिवारी, अभिषेक बॅनर्जी, कणिमोळी, गौरव गोगोई यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून ते युवा खासदारांपर्यंत व्यापक प्रतिनिधित्व या गटांमध्ये दिसून येत आहे.

पहिल्या टप्प्यात श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि यूएई अशा महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे.

युवा आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत केंद्रीय पातळीवरून त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली आहे. तसेच खासदार डॉ. शिंदे यांच्या या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे बळ मिळणार असून ते जागतिक पातळीवर आपला आणखी एक ठसा उमटवतील.

बेस्ट पार्लमेंटरी प्रॅक्टिसची देवाण/ घेवाण होणार - ओम बिर्ला (लोकसभा अध्यक्ष)

पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपच्या माध्यमातून भारतीय खासदारांना विविध देशांतील संसद सदस्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. Best Parliamentary Practices ची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच संसद ते संसद आणि जनता ते जनता या स्तरावर संवाद वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या उपक्रमामुळे पारंपरिक कूटनीतीबरोबरच Parliamentary Diplomacy ला चालना मिळणार असून भारताची जागतिक स्तरावरील उपस्थिती अधिक बळकट होणार असल्याचे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT