Shrikant Shinde MP Pudhari
ठाणे

Shrikant Shinde MP: संसदेत अभ्यासू, मतदारसंघात विकासकेंद्रित नेतृत्व : डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासातून ठसठशीत ठसा उमटवणारा संसद रत्न पुरस्कारप्राप्त खासदार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे लोकसभा मतदारसंघाला अभ्यासू लोकप्रतिनिधींची परंपरा आहे. पूर्वीच्या एकत्रित लोकसभा मतदार संघातून रामभाऊ म्हाळगी यांनी खासदार म्हणून या विभागाचे अतिशय समर्थ नेतृत्व केले. ठाणे जिल्ह्याचे प्रश्न त्यांनी अत्यंत हिरीरीने मांडले. खासदार प्रा. राम कापसे, प्रकाश परांजपे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपापली कारकीर्द गाजवली. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि अभ्यासू खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्तृत्वाची हीच परंपरा कायम राखली आहे. संसद रत्न पुरस्कारप्राप्त डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या अभ्यासू भाषणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रभावित केले आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ मोहीम राबवली. या मोहिमेविषयी भारताची बाजू जगापुढे मांडण्यासाठी भारत सरकारने काही शिष्टमंडळे विविध देशांमध्ये पाठवली. त्यातील एका पथकात डॉ. शिंदे यांचा समावेश होता.

विकास प्रकल्पांबाबत ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबईच्या तुलनेत कल्याण, डोबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ ही शहरे उपेक्षित राहिली होती. दोन महापालिका आणि एक नगरपालिका क्षेत्र कल्याण लोकसभा क्षेत्रात येते. या व्यतिरिक्त नागरीकरण झालेली अनेक गावेही या मतदारसंघात आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून काम करणे निश्चितच आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत 12 वर्षांपूर्वी डॉ. शिंदे या मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. खासदार म्हणून सूत्रे हाती घेताच त्यांनी त्यांच्या कार्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून मगच त्याविषयी बोलणे ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सवय आहे. त्यामुळे संसदेत त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी परिणामकारकपणे मांडलेच; पण त्याचबरोबर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली. संसदेतील कामकाजात त्यांचा नियमित सहभाग असतो. त्यांची संसदेतील उपस्थिती 80 टक्के इतकी आहे. पूर्वीच्या दोन टर्ममध्ये त्यांनी संसदेतील एकूण 116 चर्चांमध्ये भाग घेतला. त्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी 574 प्रश्न उपस्थित केले. 12 खासगी विधेयके मांडली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांनी राबवल्या. त्यामुळे आता ही शहरे कात टाकू लागली आहेत. सध्या कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यात रेल्वे, मेट्रो, रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण, नव्या आणि पर्यायी रस्त्यांची उभारणी आदींचा समावेश आहे.

कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्प, ऐरोली-काटई फ्री वे, कल्याण-शीळ फाटा रस्ता रुंदीकरण, कल्याण फाटा उड्डाणपूल, मुंब्रा उड्डाणपूल, शीळ फाटा सहापदरी उड्डाणपूल, कल्याण-रिंगरोड, मोठा गाव माणकोली उड्डाण पूल, विठ्ठलवाडी-कल्याण उन्नत मार्ग, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांची उभारणी, काटई-अंबरनाथ रस्त्याचे काँक्रिटीकरण, डोंबिवली शहरातील निवासी विभाग तसेच औद्योगिक विभागातील रस्ते, अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिल्पवैभवाचा वारसा असलेल्या शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण, डोंबिवलीनजीक खिडकाळी मंदिर परिसर विकास, या मंदिराच्या परिसरात दरवर्षी साजरा होणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल, श्री मलंगगड परिसरात विविध प्रकारच्या सोयी सुविधा, फ्युनिक्युलर, दिवाळीनिमित्त डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ परिसरात दिवाळी पहाट संगीत मैफलींचे आयोजन, अंबरनाथ येथे पालिकेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाची उभारणी, कल्याण पूर्व विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञानकेंद्र, दिव्यातील बेतवडे येथे आगरी - कोळी - वारकरी भवन, डोंबिवली येथे नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, कल्याण येथे हिंदी भाषी भवन आदी अनेक प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यामुळे मार्गी लागले.

कल्याण-बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान नवे चिखलोली स्थानक निर्माणाधीन आहे. नव्या मार्गिकांमुळे तसेच स्थानकामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. डोंबिवली, ठाकुर्ली, उल्हासनगर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कल्याण स्थानकात रिमॉडेलिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण स्थानकात गाड्यांचा खोळंबा होणार नाही. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही लोकल सेवा त्यामुळे कल्याणला खोळंबणार नाहीत.

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्य असे विविधांगी आहे. मागच्या दोन टर्मप्रमाणेच सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या टर्ममध्येही त्यांचे काम त्याच धडाक्याने सुरू आहे. किंबहुना दहा वर्षांच्या अनुभवाने त्यांच्या कार्यात अधिक अचूकता आणि परिणामकता आली आहे. त्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांमध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे.
अभिजित दरेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT