नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र श्री मलंगगड यात्रेला गुरुवारपासून भक्तिभावात सुरुवात झाली. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडी-गावामधून वंशपरंपरागत पुजारी ॲड. विजय केतकर यांच्या निवासस्थानावरून श्री मलंग मत्स्येंद्रनाथ यांची पालखी गडाकडे प्रस्थान करताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाच्या जयघोषात आणि वारकरी संप्रदायाच्या मंगल घोषणांमध्ये पालखी मार्गस्थ झाली.
गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. परिसरातील हजारो ग्रामस्थ, वारकरी, धारकरी आणि श्री मलंगभक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”
च्या गजरात पालखीने केतकर यांच्या निवासस्थानातून प्रस्थान केले. परंपरेनुसार पालखी प्रथम वाडी-गावातील श्री दत्त मंदिरात विसाव्यासाठी थांबली होती. तेथे महाआरती झाल्यानंतर वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत पालखीने श्री मलंगगडावर प्रस्थान केले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत आणि हरिनामाचा गजर करत स्वागत केले. या सोहळ्याला परिसरातील गावकऱ्यांचा लक्षणीय सहभाग लाभला. वारकरी भजन, अभंग, गवळणींच्या नादात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत पालखी गडाकडे मार्गस्थ झाली. यावेळी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माघ पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या मुख्य उत्सवासाठी राज्यभरातून भाविक श्री मलंगगडावर दाखल होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांसह पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
यंदा श्री मलंगगडाचा लढा कायदेशीरदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याने या यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पालखी सोहळ्यात शिवसेनेचे आमदार राजेश मोरे, राजेश पाटील, अविनाश साळवी, समीर भंडारी आदी सहभागी झाले होते. माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारा पालखी सोहळा भक्ती, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरणार आहे.
पालखी दुपारच्या सुमारास श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात पोहोचली. मात्र यावेळी मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या तत्पर आणि संयमी भूमिकेमुळे कोणताही मोठा वाद किंवा प्रकार घडला नाही. यात्रेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. श्रद्धा, परंपरा आणि शांतता अबाधित ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असून यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली आहे.